श्रीगोंद्यात महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंद्यायातील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढत तिला शिवीगाळ करून त्या मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी दोघा जणांविरुध्द श्रीगोंदा पोलीस ठाण्यात विनयभंगासह ॲट्रॉसिटी तसेच बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंद्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणारी एक अल्पवयीन मुलगी सोमवार दि. ९ रोजी कॉलेज सुटल्यावर सायंकाळी ६ वाजता घरी जाण्यासाठी रस्त्याने जात असताना तिच्या पाठीमागून आलेल्या येथील दादा बिबे (रा. नवनाथनगर, अधोरेवाडी) व गौरव (पूर्ण नाव माहित नाही) या दोघांनी सदर मुलीविषयी अश्लील बोलण्यास सुरुवात केली. 
Loading...

यावेळी पीडित मुलगी त्या ठिकाणाहून निघून श्रीगोंदा बसस्थानकावर गेली. तेव्हा दादा बिबे आणि गौरव त्या ठिकाणी आले आणि सदर मुलीची त्यांनी छेड काढली. यावेळी मुलीने त्यांना जाब विचारला असता त्या दोघांनी सदर मुलीला अश्लील भाषेत शिवीगाळ केली व तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. 

यावेळी काही लोक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी मुलीची छेड काढणाऱ्या या दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दोघांनी समजावून सांगणाऱ्या लोकांनाच दमदाटी करत शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यानंतर मुलीने रिक्षाने घरी जाऊन सदर प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर पुन्हा दादा बिबे आणि गौरव यांनी मुलीच्या घरी जाऊन मुलीला व तिच्या आई-वडिलांना दमदाटी केली. 

या प्रकाराबाबत मुलीने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बाल लैगिक प्रतिबंधक कायदा तसेच विनयभंग व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदयानुसार दोघा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास श्रीगोंदा कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे हे करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.