पर्यावरण रक्षण प्रत्येक नागरिकांची जबाबदारी: डॉ.पी.अन्बलगन


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे, प्लॅस्टिकचा चा वापर टाळणे पर्यावरण रक्षणासाठी अत्यावश्यक असून प्रत्येक नागरिकाने यासाठी योगदान द्यावं असं आवाहन राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ.पी.अन्बलगन यांनी केले.

महाराष्ट्र सरकारचा पर्यावरण विभाग,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र संस्कृती कला मंच आयोजित," पर्यावरणाची वारी,पंढरीच्या दारी" या आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.पुणे येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रम प्रसंगी या उपक्रमाचे मार्गदर्शक, लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ.प्रकाश खांडके,भारुडसम्राज्ञी चंदाताई तिवारी,शाहीर देवानंद माळी दिंडी प्रमुख ह.भ.ज्ञानेश्वर वाबळे महाराज,कार्यकम संयोजक संजय भुस्कुटे यांसह वारकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.


Loading...
याप्रसंगी कीर्तन,भारुड,पोवाडे,लोकगीते, बतावणी,भजन या माध्यमातून पर्यावरण रक्षण, वृक्षारोपण व संवर्धन, प्लॅस्टिकबंदी,स्त्रीशिक्षण,स्त्रीभ्रूणहत्या, पाणीबचत, जलसंधारण,सेंद्रिय शेती, व्यसनमुक्ती,स्वच्छता अभियान आदी सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन करण्यात आले.

यावेळी दिंडीप्रमुख ह.भ.प.ज्ञानेश्वर वाबळे महाराज यांनी सांगितले अशाच प्रकारे  ज्ञानोबा-तुकोबा,विठूनामाचा गजर व प्रबोधनपर कार्यक्रम सादर करत आम्ही ही 'पर्यावरणाची वारी,पंढरीच्या दारी' घेऊन जात आहोत.याला महाराष्ट्र भरातून तरुण,महिला,नोकरदार, व्यावसायिक नागरिकांचा ही मोठा प्रतिसाद मिळत असून आम्हा समस्त वारकरी, लोककलाकार मंडळींसोबत हे सर्व या पर्यावरणाच्या वारी मध्ये सहभागी होऊन जनजागृती करत आहेत.

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील ही दिंडी क्रमांक ८६ असून यंदा पर्यावरण वारीच्या उपक्रमाचे बारावे वर्ष आहे. या उपक्रमाचा समारोप आषाढी एकादशी च्या आदल्या दिवशी २२ जुलै रोजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितत होईल,अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.