वाळूतस्करांवर कारवाईसाठी पेडगावच्या महिला सरपंचाचे उपोषण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यात भीमानदी व घोड नदीपट्ट्यात बेसुमार वाळूउपसा होत आहे. वाळूउपसा व वाळूवाहतुकीमुळे या भागातील गावांमधील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गावातील रस्ते या वाळूवाहातुकीमुळे खराब होत आहेत. ग्रामस्थांनी याबाबत अनेकदा वाळूतस्करांना समजावण्याचा प्रयत्न केला. 

परंतु मुजोर वाळूतस्कर गावकाऱ्यांना भीक घालत नाहीत, ही वाळूचोरी थांबवण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा महसूल विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु ही वाळूतस्करी रोखण्यात महसूल विभागाला अपयश येत आहे.
भीमानदीपट्ट्यातील पेडगाव गावामध्ये वाळूतस्करांनी चांगलाचा धुमाकूळ घातला असून, या वाळूतस्करांवर कारवाई करण्याची मागणी करत पेडगावच्या महिला सरपंच सुलोचना भगवान कणसे या ग्रामस्थांसह सोमवारी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या आहेत. 
Loading...

त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, वाळूतस्करांनी पेडगावमध्ये धुमाकूळ घातला आहे. वाळूवाहतुकीमुळे गावातील रस्ते खराब झालेले आहेत, पाणी योजना बंद पडली आहे.

 वाळूउपसा करणाऱ्या जेसीबी मशीनने अनेक शेतकऱ्यांच्या पाईपलाईन फोडल्या आहेत. गावातील भवानी माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाळूतस्कर मोठाले दगड लावतात रस्त्यात खड्डे खांदतात त्यामुळे गावकऱ्यांना मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता राहिला नाही. 

स्मशानभूमीकडे जाणार रस्ता या वाळूचोरांनी खराब केल्यामुळे गावात एखादी व्यक्ती मयत झाल्यास तिला समशानभूमीत घेऊन जाता येत नाही. जवळपास पन्नास जेसीबी मशीनच्या माध्यमातून सरस्वती नदी भीमानदीमध्ये वाळूतस्कर वाळूचोरत आहेत. 

हे पर्यावरणास देखील हानिकारक आहे. जुन्या पेडगाव मधील जिल्हा परिषद शाळेजवळ वाळूतस्करांचे पंटर लोकेशनसाठी बसलेली असतात. त्यांचा मोठ्याने गोंधळ सुरू असल्यामुळे शिक्षकांना शाळेत शिकवताना अडचण येत आहेत. त्यामुळे या वाळूतस्करांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सरपंच कणसे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.