माजी आ.पांडुरंग अभंग यांच्या भूमिकेकडे नेवाशाचे लक्ष


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विधानसभेला अवधी असला तरी नेवासा तालुक्यात आतापासूनच राजकीय व्यूहरचना आखली जात असून राजकीय गोटाचे लक्ष मात्र माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या भूमिकेकडे लागले आहे. तालुक्यात सर्वच पक्षांनी विधानसभेसाठी पडद्याआडून तयारी सुरू केली आहे. 

माजी आमदार अभंग पुढील राजकीय वाटचालीसाठी कोणता निर्णय घेणार याचीच उत्सुकता तालुक्यात निर्माण झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यात राजकीय हलचालींना वेग आला आहे.. माजी आमदार अभंग हे राजकारणातले प्रामाणिक, निष्ठावान व निष्कलंक अशी प्रतिमा असलेले ज्येष्ठ नेते आहेत. 

Loading...

तालुक्यात लोकसभेपेक्षाही विधानसभा निवडणुकीचीच अधिक चर्चा सुरू आहे. प्रत्येक पक्षाने तालुक्यात आतापासूनच तयारी सुरू केलेली असली तरी सर्वाधिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत माजी आमदार पांडुरंग अभंग. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त, राज्य समता परिषदेचे उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आदी पदे भूषवलेले श्री. अभंग आता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत. 


सद्यस्थितीत श्री. अभंग राजकीय प्रवाहातून बाजूला होत जाण्याच्या मनस्थितीत असले तरी तालुक्यात मात्र त्यांच्या भूमिकेला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. . नेवासा तालुक्यात अनेकांनी विधानसभेसाठी आतापासूनच तयारी सुरू केलेली आहे. मात्र, अभंग यांच्या निणर्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


त्यांना आता विधानसभेसाठी रस नसला तरी त्यांना न मागता अनेक पदे चालून आल्याने मोठमोठ्या संस्थावर काम करण्याची संधी मिळाली. ज्या-ज्या पदांची त्यांनी धुरा सांभाळली तिथे त्यांनी केलेला कारभारही पारदर्शक असाच ठरला. राजकारणी प्रामाणिक व निष्ठावान कसा असावा हे त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणाला दाखवून दिले. 


राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांशी त्यांचे थेट घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणाातही अभंग या नावाला वेगळे वलय आहे. त्यांची भूमिका तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी ठरेल, असा राजकीय गोटातील अंदाज आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.