पोलिस उपनिरीक्षकांकडून छगन भुजबळांविषयी अपशब्द,आज श्रीगोंदा शहर बंद


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव, यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी अपशब्द वापरल्यामुळे आज श्रीगोंद्यात काहीकाळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. 

सदर अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केल्याने त्यामुळे काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी व तहसीलदार महेंद्र महाजन यांनी वरिष्ठांशी चर्चा करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.

ओबीसी समाज, समता परिषद यांच्यावतीने तहसीलदार व श्रीगोंदा पोलिस निरीक्षक यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच घटनेच्या निषेधार्थ शनिवार दि.९ रोजी श्रीगोंदा शहर बंदची हाक दिली आहे. 


Loading...
याबाबत माहिती अशी की, उपनिरीक्षक महावीर जाधव हे त्यांच्या सहकाऱ्यांसह दि.८ रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एका आरोपीच्या शोधासाठी तालुक्यातील कोसेगव्हाण येथे गेले होते. याप्रकरणाच्या तपासकामी त्यांनी कोसेगव्हाणचे माजी उपसरपंच भीमराव बापूराव नलगे यांच्या घरी जावून चौकशी केली.

चौकशी दरम्यान त्यांच्याकडून छगन भुजबळ यांच्याविषयी एक अपशब्द वापरण्यात आला तसेच नलगे कुटुंबातील महिला, वृद्ध यांनाही अपशब्द वापरल्याचा आरोप नलगे कुटुंबीयांनी केला आहे.

सदर प्रकरणाची अडिओ क्लिप सकाळी सोशल मीडियावर व्हायरल होताच.ओबीसी समाजबांधव व समता परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक होत नलगे कुटुंबीयांसह त्यांनी श्रीगोंदा तहसीलच्या प्रवेशद्वारावर ठिया आंदोलन सुरू केले. 

यावेळी अनेकांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. तहसीलदार महेंद्र महाजन यांना निवेदन दिल्यानंतर सर्व जमाव श्रीगोंदा पोलिस ठाण्यावर जात अधिकाऱ्याने नलगे कुटुंबियातील महिलांना अवमानाची वागणूक दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.