छिंदमचा राजीनामा त्याचे गुरू खा.दिलीप गांधींनीच महापौर कार्यालयाकडे पाठवला होता !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :छिंदमची बुद्धी भ्रष्ट झाली असून खासदार श्री. दिलीप गांधी यांनीच शिवद्रोही छिंदमचा राजीनामा महापौर कार्यालयात पाठवला होता असा खुलासा माजी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदम ने उपमहापौर पदाचा राजीनामा दिलाच नाही असा खुलासा नगरविकास विभागाकडे केला होता,महापौर कदम यांनी माझ्या लेटरहेडचा गैरवापर करुन, राजकीय षडयंत्र करुन माझी बनावट सही असलेला उपमहापौर पदाचा राजीनामा तयार करुन मंजूर करण्याचा गुन्हा केलेला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई अपेक्षित आहे, असा खुलासा श्रीपाद छिंदमने नगरविकास विभागाकडे केला होता. 

या आरोपास उत्तर देताना कदम यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले आहे कि, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अपशब्द व गलिच्छ भाषा वापरणाऱ्या शिवद्रोही श्रीपाद छिंदमच्या कृत्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. 

भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक व शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी यांचा कट्टर समर्थक असणाऱ्या छिंदमचे प्रकरण अंगलट आल्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी खा. गांधी यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन त्यांची हकालपट्टी केली.

त्याचा उपमहापौरपदाचा राजीनामा घेण्यात आल्याचे माध्यमांसमोर जाहीर करून त्याच्या प्रतीही त्यांनी दिल्या. त्याच्या दुसर्‍या दिवशीच खा. गांधी यांच्या कार्यालयातून त्यांच्याच कार्यकर्त्यांनी राजीनाम्याची प्रत महापौर कार्यालयात व आयुक्त कार्यालयात आणून दिली.

महापौरांनी ती प्रत नगरसचिव कार्यालयाकडे सादर केल्यानंतर प्रशासनाने राजीनाम्यावर पुढील कार्यवाही केली. विभागीय आयुक्तांकडे नवीन उपमहापौर निवडणुकीसाठी प्रस्ताव पाठविला. निवडणूक जाहीर होऊन शिवसेनेचा बिनविरोध उपमहापौर झाला.

मनपाच्या महासभेतही सर्व नगरसेवकांनी छिंदमच्या अशोभनीय कृत्याचा निषेध करत त्याचा नगरसेवक पद रद्द करण्याचा एकमुखी ठराव मंजूर केला. त्यानंतर आता, बुद्धी भ्रष्ट झालेल्या छिंदमला आपण राजीनामा दिला नसल्याचा साक्षात्कार झालाय.

उपमहापौर निवडणूक होऊन दोन-तीन महिने लोटल्यानंतर मी उपमहापौरपदाचा राजीनामा दिलाच नसल्याचे व महापौरांनी त्याच्या लेटरहेड चा गैरवापर करून गंभीर गुन्हा केल्याच्या बोंब ठोकण्यास छिंदम ने सुरुवात केली आहे. छिंदमचा राजीनामा त्याचे गुरू असलेल्या खासदारांनीच महापौर कार्यालयाकडे पाठवला होता हे जग जाहिर आहे.


Loading...
त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेत घोषणा केली होती. असे असताना निव्वळ महापौरांची बदनामी करण्याच्या उद्देशाने छिंदमने बेछूट व तथ्यहीन आरोप करण्यास सुरुवात केली आहे. यातून त्याची बुद्धी खरोखरच भ्रष्ट झाल्याचे सिद्ध होत आहे.

छिंदमने नगरविकास विभागाला मी स्वतःची स्वाक्षरी असलेला राजीनामा दिलेला नसल्याचे म्हटले आहे. यावरून त्याचा राजीनामा जाहीर करणारे व महापौर कार्यालयाकडे पाठविणारे खा. श्री दिलीप गांधी व भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे.

छत्रपती शिवऱायांबाबत अपशब्द वापरून सर्व पातळ्या ओलंडलेल्या नैतिकता गमावलेल्या छिंदम ने घेतलेल्या आक्षेपांवर भारतीय जनता पक्ष व खा. श्री दिलीप गांधी यांनी सपशेल मौन बाळगले आहे.

केवळ अंगाशी आलेले प्रकरण थांबवण्याची वेळ, वेळ मारून नेण्यासाठी छिंदमचा राजीनामा जाहीर करून खासदार गांधी व भाजप ने वेळ मारून नेली का? छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या शिवद्रोही छिंदमचा राजीनामा खासदारांनी घेतलाच नाही का?

छिंदम ची हकालपट्टी करून आणि त्याचा उपमहापौरपदाचा राजीनामा घेऊन छत्रपती शिवरायांबद्दल भाजपच्या मनात आदर आणि प्रेम असल्याचे दाखवून देणाऱ्या भाजप ने व खासदाराने तमाम शिवप्रेमींची दिशाभूल केली नाही ना?

उपमहापौर निवडणुकीच्या वेळी आक्षेप न घेणारा छिंदम आज दोन-तीन महिन्यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला नसल्याचे सांगत महापौरांवर बेछूट आरोप करतो. त्याचा राजीनामा घेतला असे जाहीर करून तो महापौर कार्यालयाकडे पाठवणारे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार गांधी यांनी यावर चकार शब्दही बोलायला तयार नाहीत.

किंबहुना कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे उपमहापौरपदाच्या राजीनाम्या वरून खासदार गांधी व छिंदम संगमताने जनतेची व शिवप्रेमीची दिशाभूल तर करत नाही ना?

मनपाच्या महासभेत नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव होत असताना खासदार पुत्र व भाजप नगरसेवक श्री. सुवेंद्र गांधी, श्री बाबासाहेब वाकळे यांनी आम्ही जेलमध्ये जाऊन छिंदम चा नगरसेवक पदाचा राजीनामा घेऊन येवु, अशी घोषणा केली होती. त्याचाही भाजपला विसर पडला आहे.

छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल नाक घासून माफी मागितली असल्याचे विनवणी करणारा व्हिडिओ तयार करून पाठविणारा छिंदम आता पुन्हा डोके वर काढण्याचा प्रयत्न करतो. न्यायालयातही त्याने माफी न मागता गुन्हा कबूल न करता जामीन मिळवला आहे.

हे कोणतेही अशोभनीय कृत्य केले नसल्याचे भासवत नगरसेवक पद रद्द करण्याच्या ठरावालाही आक्षेप घेतो. भारतीय जनता पार्टीचे नेते यावर चुप्पी साधून त्याला उघडपणे मदत करत असल्याचे यावरून स्पष्ट होतेय.

त्यामुळे छिंदम बरोबरच भाजपाच्या विरोधातही शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तमाम शिवप्रेमी व शिवसेने मार्फत भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष यांना याचा जाब विचारणार आहोत, असे संभाजी कदम यांनी सांगितले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.