निरंजन डावखरेंना धडा शिकवण्यासाठी शरद पवार सक्रीय !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपच्या गोटात दाखल होऊन कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी मिळवणाऱ्या निरंजन डावखरेंना धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादीने शक्य ते सर्व प्रयत्न सुरू केले आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राष्ट्रवादीने या लढतीत काँग्रेस, शेकाप, आरपीआय कवाडे गट आणि समाजवादी पक्षाचा पाठिंबा मिळवला आहे. 

या मतदारसंघातून राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक नजीब मुल्ला यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवारी राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप, आरपीआय( कवाडे गट ) आणि सपा यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा नवी मुंबईच्या विष्णुदास भावे सभागृहात पार पडला.

Loading...
या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संबोधित केले. शिक्षक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये जशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी ताकद उभी केली तशीच ताकद नजीब मुल्ला यांच्या पाठीशी उभी करा, असे आवाहन पवार यांनी केले.

या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले, सत्तेत आल्यावर भाजपचा मस्तवालपणा वाढला आहे. आपण मात्र सत्ता गेली म्हणून गलितगात्र व्हायचे नाही आणि पुन्हा सत्ता आली तरी मस्तवाल व्हायचे नाही. 

विरोधकांच्या पदाधिकाऱ्यांवर आणि आमदारांवर धाडी टाकून भाजप विरोधकांचा आवाज दडपू पाहत आहे. मात्र, आज महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे. लोक पर्याय मागत आहेत. त्यामुळे परिवर्तन घडवायचे असेल तर एका विचाराचे लोक एकत्र यायला हवेत, असेही पवार म्हणाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.