शेवगावात राजकीय भूकंप,नगराध्यक्षा विरुध्द अविश्वास ठराव दाखल !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. विद्याताई लांडे यांच्याविरुध्द सत्ताधारी राष्ट्रवादी-अपक्ष व विरोधी भाजप अशा १५ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे. सौ. लांडे यांची नगराध्यक्ष पदाची मुदत अवघ्या दोन महिन्यांनी संपत असताना एवढ्या घाईत नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केल्यामुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या ठरावावर राष्ट्रवादीचे ५, भाजपचे ८ व अपक्ष २ नगरसेवकांच्या सह्या आहेत. 

परिषदेत २१ नगरसेवक असून, त्यात राष्ट्रवादीचे ९, भाजपचे ८ व अपक्ष ४ असे बलाबल आहे. जानेवारी २०१६ मध्ये निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादीने ३ अपक्षांना सोबत घेत नगराध्यक्ष म्हणून सौ. विद्याताई लांडे यांची निवड केली होती. मात्र, त्यानंतर वर्षभराच्या काळातच राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद उफाळून आले. 

राष्ट्रवादीच्या व त्यांच्या गोटात असणाऱ्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा सौ. लांडे यांच्या विरोधात वारंवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ.चंद्रशेखर घुले यांच्याकडे तक्रारी केल्या, श्री. घुले यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला; परंतु नगरसेवकांची नाराजी कायम राहिली. 

Loading...
त्याची परिणती म्हणून या असंतुष्ट नगरसेवकांनी दोन महिन्यांपूर्वी राष्ट्र्वादीच्या गटनेतेपदावरून सौ.लांडे यांना हटवत अपक्ष नगरसेवक सागर फडके यांची गटनेतेपदी निवड केली. सौ.लांडे यांची नगराध्यक्ष पदाची मुदत येत्या दोन महिन्यांत संपत आहे. त्यानंतर अनुसूचित जाती महिला या प्रवर्गाकारिता नगराध्यक्ष पद राखीव आहे. 

अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर तो मतदानाला घेणे,तो मंजूर होणे व त्यानंतर नवीन नगराध्यक्षाची निवड करणे या प्रक्रियेला एक महिन्याचा कालावधी लागेल. त्यांनतर एक महिन्याच्या औट घटकेचा नगराध्यक्ष निवडला जाईल. 

या बाबतची संपूर्ण कल्पना नगरसेवकांना असतानाही अविश्वास ठराव दाखल झाल्याने शहरवासीयांच्या भुवया उंचावल्या आहेत.विशेष म्हणजे हा ठराव दाखल करण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आमदार मोनिका राजळे यांची भेट घेतली. एवढेच नव्हे तर वेळप्रसंगी आमची भाजपत प्रवेश करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले, अशी माहिती आहे. 

या सर्व घडामोडींत राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून, वर्षभरावर आलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अविश्वास ठराव संमत झाला तर त्याचे दूरगामी परिणाम पक्षाला भोगावे लागतील.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.