आमदार मोनिका राजळेंच्या कार्यालयात पंचायत समिती सदस्याला मारहाण !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी ग्रामसेवक नियुक्तीवरून पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या वादाला मुद्यावरून गुद्याचे स्वरूप आले. आमदार मोनिका राजळे यांच्या शहरातील संपर्क कार्यालयात पंचायत समिती पदाधिकाऱ्याच्या मुलासह समर्थकांनी एका पंचायत समिती सदस्याला मारहाण केली. 

या प्रकारामुळे कार्यकर्त्याची पळापळ होऊन एकच गोंधळ उडाला. शहरातील साईनाथनगर भागातील व्हाईट हाउस या आमदार राजळे यांच्या संपर्क कार्यालयात बुधवारी नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारानिमित्त भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, अन्य पदाधिकारी व भाजप उमेदवारांच्या समर्थकांसह बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

बैठक पार पडल्यानंतर जिल्हाध्यक्ष बेरड व वरिष्ठ पदाधिकारी पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. नंतर जैन समाजमंदिरासाठी आमदार राजळे यांनी निधी मिळवून दिल्याबद्दल नगरसेविका दीपाली रामनाथ बंग यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाकडून आमदारांचा सत्कार झाला. 


Loading...
भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मनीषा घुले व अन्य कार्यकर्त्यांनी शहरात महिलांसाठी व्यायामशाळेच्या मंजुरीसाठी चर्चा केली. मुख्य सभागृहात गाठीभेटी सुरु असताना वरच्या मजल्यावरून गोंधळ, शिवीगाळ व आरडाओरड ऐकून आमदारांसह सर्वजण बाहेर आले. 

त्यावेळी संबंधित पंचायत समिती सदस्य कपडे फाटलेल्या अवस्थेत ओरडत होता. दोन्ही गटांमध्ये जोरात शिवीगाळ सुरू होती. कार्यकर्त्यांची पळापळ झाली. आठवडे बाजाराच्या दिवशी असा प्रकार घडल्याने काही मिनिटात हा प्रकार संपूर्ण तालुक्यात कानोकानी झाला. 

पत्रकारांना सर्व नेत्यांचे फोन सुरू झाले. आमदार राजळे यांनी आपल्या कार्यालयात दोन्ही गटांना बंद खोलीत बोलवत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका गटाने वाद मिटल्याचे पत्रकारांना सांगितले. 

मारहाण झालेल्या संबंधित सदस्याचा फोन स्वीच ऑफ होता. तालुका पातळीवरील संस्थेच्या प्रतिनिधींमध्ये नेत्याच्या कार्यालयात मारामारी होण्याचा तालुक्यातील हा पहिलाच प्रकार पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.