खड्डेमय रस्त्यावरील डबक्यात महापौरांची प्रतिकात्मक खुर्ची ठेवून मनसेचे आंदोलन


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पहिल्याच पावसाने आगरकर मळा येथील खड्डेमय रस्त्यात साचलेल्या पाण्यांच्या डबक्यात महापौरांची प्रतिकात्मक खुर्ची ठेवून त्याला पुष्पहार अर्पण करुन महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने निष्क्रीय मनपा प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. 

नितीन भुतारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात युवा कार्यकर्त्यांनी रस्तावरील खड्डयांसह सेल्फी घेत, तक्रारासाठी महापौरांनी सुरु केलेल्या मोबाईल अ‍ॅपवर हा फोटो पोस्ट करण्यात आला. मनसेची नगरसेविका असलेल्या प्रभागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

प्रभाग क्र.27 मधील आगरकर मळा भागातील आनंदनगर, सागर कॉम्प्लेक्स, स्मृती कॉलनी, विशाल कॉलनी या सर्व परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. रस्त्याच्या प्रत्येक फुटाच्या अंतरावर खड्डयाचे साम्राज्य पसरले आहे.

खड्डेमय रस्त्यामुळे स्थानिक नागरिकांना पाठ दुखीचा त्रास असून, वाहन चालवणे कठिण झाले आहे. तर यामुळे अनेक लहान मोठे अपघात घडत आहे. अजून पुर्ण पावसाळा जायचा असून, या रस्त्यांवरील खड्डयांची परिस्थिती पाणी अडवणार्‍या शेततळ्यांसारखी झाली असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.


Loading...
नितीन भुतारे म्हणाले की, महापालिकेचे सत्ताधारी व स्थानिक नगरसेवकांचे या प्रभागाकडे लक्ष नसल्याने या भागातील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. या परिसरात अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या असून, या प्रभागाला कोणी वाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा नागरिकांसह तीव्र स्वरुपात महापालिका व लोकप्रतिनिधीच्या दारात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या आंदोलनात गणेश लालबागे, संतोष मेहेर, गणेश शिंदे, अविनाश क्षेत्रे, अशोक दातरंगे, अजय धोत्रे, शुभम कासवा, अमन काजी, वैभव मतकर, विशाल खताडे, अमोल हजारे, सोनू मेहेर आदिंसह युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.