नगर-मनमाड रस्त्यावर कंटेनर व मोटारसायकलच्या भीषण अपघातात दोघे ठार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-मनमाड रस्त्यावरील निर्मळ पिंपरी जवळ टोलनाक्यालगत कंटेनर व मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. कंटेनरने मोटारसायकल वरील दोघांना सुमारे ५०० फूट फरफटत नेवून चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

घटनेनंतर संतप्त जमावाने व मृतांच्या नातेवाईकांनी कंटेनर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. दोन्ही मृत युवक साकुरी येथील असून सदर घटना काल सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली. नीरज विलास बनसोडे (वय २६ रा. साकुरी) व सुदर्शन सुधाकर थोरात (वय २९ रा. साकुरी) ही या अपघातातील मृतांची नावे आहेत. 

नगरहून मोटारसायकल नं. एमएच १७ - ४८६८ वरून मयत दोघे राहात्याकडे जात होते. तर कंटेनर नं. आरजे-१४-८४३८ हा शिर्डीकडे जात होता. निर्मळ पिंपरी टोलनाक्याजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरनेच धक्का दिल्याने हे दोघे मोटारसायकलस्वार मागील बाजूने कंटेनरला अडकून फरफटत गेल्याचे बोलले जात आहे.

Loading...
घटनेनंतर संतप्त जमावाने व मृतांच्या नातेवाईकांनी कंटेनर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र लोणी पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्याने पुढील अनर्थ टाळला. घटनेनंतर १०८ तात्काळ पोहोचली परंतु अपघातात दोघेही मयत असल्याने त्यांनी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास असमर्थता दर्शवली.त्यामुळे आणखी काही काळ तणाव वाढला होता. यावेळी लोणी पोलिसांनी खाजगी वाहनाने दोन्ही मृतदेह प्रवरा रुग्णालयात आणले. त्यामुळे घटनास्थळावरील तणाव निवळला. 

निर्मळ पिंपरी ते टोलनाक या परिसरात वारंवार अपघात होत आहेत. मात्र याकडे अद्यापही संबंधित विभाग लक्ष देण्यास तयार नाही. टोलनाका ते निर्मळ पिंपरी दरम्यानचा रस्ता आणखी किती जणांचे बळी घेणार असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.