शेवगावात चोरांचा धुमाकूळ, पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव तालुक्यातील निंबेनांदूर येथे सोमवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास चोरटयांनी भरवस्तीत तीन घरे फोडून सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. अन्य तीन ठिकाणीही घरफोडी करण्याचा प्रयत्न चोरांनी केल्यामुळे घबराट पसरली आहे. 

Loading...
याबाबत सविस्तर असे कि,येथील डॉ. प्रभाकर बुधवंत हे रात्री १० वाजण्याच्या सुमारास पहिल्या मजल्यावर झोपले होते. वातावरणात जास्त उकाडा असल्याने त्यांची मुलगी शुभदा हिने गलरीचा दरवाजा उघडा ठेवला होता.चोरांनी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास पाईपद्वारे चढून पहिल्या मजल्यात प्रवेश केला व घरातील सुमारे बारा तोळे सोन्याचे दागिने व रोख ३० हजार लंपास केले.

चोरटयांचा आवाज ऐकून शुभदा जागी झाली, तिने डॉ. प्रभाकर बुधवंत यांना हाक मारली,हाक मारल्याचा आवाज ऐकताच डॉ. बुधवंत शुभदा हिच्या खोलीकडे धावले, हा आवाज ऐकून तीन अनोळखी पुरुष व गावात राहणारी एक तरुणी जिन्यातून उतरून पळून जाताना त्यांनी पाहिले.

दुसरी घटना निंबेनांदूरचे उपसरपंच रंभाजी बुधवंत यांच्या घरात घडली. ते पाणी देण्यासाठी शेतात गेले होते, घरात त्यांचे वडील दिनकर बुधवंत उकडत असल्याने दरवाजा उघडा ठेवून झोपले होते ,चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून दिवानच्या गादीखाली ठेवलेले रोख २० हजार रुपये चोरून नेले.

तिसरी घटना लक्ष्मण नामदेव बडे यांच्या घरात घडली. त्यांच्या आई शेजारच्या घरात झोपल्या होत्या. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाट फोडले व त्यातील चार तोळे. सोन्याचे दागिने, रोख १० हजार रुपये, असा ऐवज चोरून नेला. पोलिसांनी या घटनेचा तपास आठ दिवसांच्या आत न लावल्यास पोलिसांच्या विरोधात ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच सौ. रंजना बुधवंत यांनी दिला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.