महिलेच्या अर्धनग्न पोस्टरवरून शिर्डीत स्थानिक महिला,भाविकांचा संताप.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :एका खासगी वाहिनीवरील मालिकेतील महिलेच्या अर्धनग्न पोस्टरवरून शिर्डीत प्रचंड नाराजी पसरली आहे. याबाबत स्थानिक महिला, भाविकांकडून संताप व्यक्‍त केला जात आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील पथदिव्यांच्या खांबांवरील या पोस्टरची चांगलीच चर्चा सुरू आहे. 

सध्या शिर्डीत साईबाबा समाधी शताब्दी वर्षाची लगबग आहे. त्यामुळे शहरात नियमित विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा यंदा भाविकांची गर्दी टिकून आहे. येथे अगदी देश, विदेशातून भाविकांचा राबता असतो. 


Loading...
यामध्ये सहकुटूंब देवदर्शनासाठी येणारे अनेक असतात. त्यामध्ये महिलांसह लहान मुलांचे प्रमाण मोठे असते. त्यातच शिर्डी शहरात प्रवेश करतानाच अगदी रस्त्याच्या मधोमध असलेल्या पथदिव्यांवरील खांबांवर एका खासगी वाहिनीवरील मालिकेतील महिलेचे अर्धनग्न अवस्थेतील पोस्टर लक्ष वेधून घेत आहे. 

शहरातील मुख्य रस्त्यांवर हे पोस्टर असल्याने कोठेही गेले तरी ते पोस्टर दिसतेच. त्यामुळ स्थानिक महिला, भाविकांकडून नगरपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे. याकडे साईबाबा संस्थाननेही लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.केवळ अधिकाधिक पैसा मिळविणे हेच ध्येय न ठेवता किमान साईंच्या भूमीत तरी नगरपंचायत प्रशासनाने असे प्रकार रोखावेत, अशी मागणी शिर्डीकर करू लागले आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.