हे सरकार केवळ घोषणाबाजी करणारे - आ.वैभव पिचड


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्यात कांदा, डाळिंब, साखर, दुधाचे भावही कवडीमोल झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट पाण्यात गेले. शेतकरी पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाला आहे. राज्य व केंद्रातले सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अकोले तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा आहे, असे आमदार वैभव पिचड यांनी सांगितले.


पत्रकार परिषदेत ते म्हणाले, दोन दिवस तालुकाभर अवकाळी पाऊस पडला. त्यात नुकसान झालेल्या शेतकरी वर्गाला तातडीची मदत मिळावी. वादळाचा तडाखा बसलेली घरे, वीज खांब व अन्य नुकसानीचे तातडीने पंचनामे केले जावेत, अशी मागणी केली. 4 जुलैला होत असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात संपूर्ण कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, दूधउत्पादकांना सरसकट 27 रुपये लीटरमागे भाव मिळावा, असा आग्रह धरणार आहे.

लाखोंचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला आत्महत्या करायला भाग पाडणारे हे सरकार आहे. या सरकारने वेळोवेळी आश्‍वासने देऊनही कार्यवाही केली नाही. त्यामुळे शेतकऱ्याला वारंवार संपावर जावे लागते. हे सरकार केवळ घोषणाबाजी करणारे आहे अशी टीकाही आ. पिचड यांनी केली. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.