लग्नाचे आमिष दाखवून ५० हजारांची फसवणूक,शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  तुमच्या मुलाचे लग्न माझ्या मुलीशी लावून देतो, असे आमिष दाखवून मुलाच्या वडिलांना ५० हजार रुपयांचा गंडा घालणारा मुलीचा पिता व मध्यस्थी करणारे अशा ५ जणांविरुध्द शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, यापैकी ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत रामनाथ अर्जुन हारदे (रा.गोटुंबे आखाडा, ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझा मुलगा गणेश याचे गोपीनाथ जगन्नाथ जाधव (रा.बेलगाव, ता. शेवगाव) यांच्या मुलीशी लग्न जमले होते. त्याकरिता शिवाजी रावसाहेब बनसोडे व रावसाहेब भिमाजी बनसोडे (रा. मळेगाव, ता. शेवगाव) व दोन अनोळखी महिला यांनी मध्यस्ती केली होती. 

तसेच २७ मे रोजी विवाहाची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्याअगोदर शेवगाव येथील एका कापड दुकानात लग्नाच्या बस्त्याची खरेदी झाली तसेच लग्नाच्या खर्चासाठी ५० हजार रुपये मुलीचे वडील व मध्यस्थांनी माझ्याकडून घेतले. परंतु लग्नाच्या अगोदरच्या दिवशी मुलीच्या वडिलांनी रात्री १२ वा. फोन करून मुलगी कोठेतरी पळून गेली आहे, आम्ही तुमच्या मुलाबरोबर तिचे लग्न लावून देऊ शकत नाही व तुमचे पैसेही परत देणार नाही, असे सांगितले. 

पोलिसांनी या गुन्ह्यात मुलीचे वडील गोपीनाथ जगन्नाथ जाधव, मध्यस्थी करणारे शिवाजी रावसाहेब बनसोडे व रावसाहेब भिमाजी बनसोडे या तिघांना अटक केली असून, परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन, पो. नि.गोविंद ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ. संतोष धोत्रे अधिक तपास करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.