अनुसूचित जातीतील फुटबॉल खेळाडूंना डावलल्याचा आरोप

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- वार्षिक वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेच्या वतीने घेण्यात येणार्‍या राज्यस्तरीय फुटबॉल निवड चाचणीत अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेकडून अनुसूचित जातीतील फुटबॉल खेळाडूंना डावलल्याचा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तर या खेळाडूंना न्याय मिळवून देण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे भिंगार शहराध्यक्ष सिध्दार्थ आढाव, अजिंक्य भिंगारदिवे आदिंसह फुटबॉल खेळाडू उपस्थित होते.


सन 2018-19 या वार्षिक वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेची निवड चाचणी दि.14 मे पासून भुईकोट किल्ला मैदान येथे चालू होती. मात्र ही निवड चाचणी घेत असताना जिल्हा फुटबॉल संघटनेच्या सचिवाकडून अनुसूचित जातीतील फुटबॉल खेळाडूंना वगळण्यात आले. तर निवड करत असताना एका विशिष्ट फुटबॉल क्लबचेच 8 ते 9 खेळाडूंची निवड झाल्याने इतर उत्कृष्ट खेळाडूंना संधी देण्यात आली नाही.

8 ते 10 वर्षापासून सदरील सचिवांची निवड झाली. जिल्ह्यातील फुटबॉल खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकत नसण्याचे कारण हे सचिव आहे. ते पुणे शहरात स्थायिक असून, स्थानिक खेळाडूंवर त्यांचे लक्ष नाही. राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या निवड चाचणी वेळी उपस्थित राहून आपल्या पदाचा गैरवापर करुन मागासवर्गीय खेळाडूंवर अन्याय करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. 

अशा वशीलेबाजीमुळे जिल्ह्यातील गुणवंत फुटबॉल खेळाडूंचे भवितव्य धोक्यात आले असून, अनेक खेळाडूंनी या खेळाकडे पाठ फिरवली आहे. सचिवांचा चालू असलेला मनमानी कारभार चालू राहिल्यास जिल्ह्यातील फुटबॉल खेळ संपुष्टात येवून गुणवंत खेळाडू यापासून वंचित राहणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या प्रकरणात लक्ष घालून मागासवर्गीय खेळाडूंना न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.