आदिवासी विकासाच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी,येऊनही हाताला काम नाही


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गेल्या ४० वर्षांत अकोले तालुक्यात आदिवासी विकासाच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी येऊनही आज हाताला काम नाही. रोजगारासाठी तालुक्याच्या बाहेर जावे लागते. महिला रोजगारासाठी स्थलांतर करत आहेत. यावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन परिवर्तन घडवण्याची गरज आहे. 

पर्यटनाच्या माध्यमातून स्त्री शक्तीची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन आदिवासी विकास प्रकल्प समितीच्या अध्यक्ष व राज्याच्या महिला आदिवासी संघटनेच्या उपाध्यक्ष, जि. प. सदस्य सुनीता भांगरे यांनी केले.

वाढदिवसाचे औचित्य साधून मुतखेल येथे आदिवासी महिला संघटनेच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी भांगरे बोलत होत्या. मुतखेल, वाकी, चिचोंडी, पेंडशेत, बारी, वारंघुशी, तेरुंगण आदी गावांत आदिवासी महिला संघटनेच्या शाखांची स्थापना करण्यात आली.

या वेळी अकोले तालुका महिला संघटनेच्या अध्यक्ष जनाबाई देशमुख, पंचायत समिती सदस्य अलका अवसरकर, ममता भांगरे, संगीता भांगरे व सहा गावांतील महिला उपस्थित होत्या. सुनीता भांगरे म्हणाल्या, आदिवासी भागात पाणी अडवण्यासाठी प्रकल्प उभे राहिले. त्यासाठी आदिवासींना विस्थापित व्हावे लागले. आजही त्यांचे पुनर्वसन झालेले नाही.

निवडणूक आली की, आदिवासी समाजाची आठवण होते. यापुढे त्यांच्या भूलथापांना बळी न पडता महिलांनी सक्षम होऊन सामुदायिक शेती, सेंद्रिय शेती, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी उद्योग सुरू करण्यासाठी संघटित व्हावे. आदिवासी विकास विभागातून जी मदत लागेल ती देण्यासाठी तुमच्यामागे खंबीरपणे उभे राहू.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.