पोलिसांच्या आशीर्वादाने दुहेरी हत्याकांडातील आरोपींना मटन अन्‌ चिकनचे जेवण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्याला हादरून सोडणाऱ्या जामखेडमधील योगेश राळेभात व राकेश राळेभात या भावांच्या दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी तुरुंगात मौजमजाच करीत आहेत. पोलिसांच्या आशीर्वादाने या आरोपींना दररोज मटन व चिकनचे जेवण पुरविण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांना मांसाहारी जेवणाचे डबे आरोपींना देताना गुरुवारी रात्री हत्याकांडात मृत्यू झालेल्याच्या नातेवाईकांनी रंगेहाथ पकडले.


Loading...
या नातेवाईकांनी तातडीने तहसीलदारांना घटनेची माहिती देऊन आरोपींना देण्यात आलेल्या जेवणाच्या डब्यांचा पंचनामा करण्यास भाग पडले. अखेर तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हत्याकांडात मृत्यू पावलेल्याच्या नातेवाईकांनी हा प्रकार उघडकीस आणून पोलिसांची चोरी समोर आणली आहे.

दि. 28 एप्रिल रोजी जामखेड शहरातील बीड रस्त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात या भावांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. भरचौकात व वर्दळीच्या ठिकाणी ही हत्या करण्यात आल्याने शहर हादरले होते. या दुहेरी हत्याकांडातील आरोपींना पोलिसांनी अटक केली. 

सध्या हे आरोपी येथील तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना आरोपीप्रमाणे वागणूक न मिळता सर्व सुविधा व बाहेरचे जेवण दिले जाते. पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने आरोपी जेलमध्येच मजा करीत असल्याची तक्रार यापूर्वीच कृष्णा राळेभात यांनी लेखी स्वरूपात तहसीलदारांकडे केली होती. मात्र, याची दखल तुरुंगाधिकाऱ्यांनी घेतली नाही.

जेलमध्ये या आरोपींना शाही जेवण मिळत असल्याची खात्रीलायक माहिती मयतांच्या नातेवाईकांना मिळाली. त्यानुसार कृष्णा राळेभात व नातेवाईक पाळत ठेवून होते. त्यानुसार दि. 28 जून रोजी रात्री 10 वाजता सुदाम राऊत व गणेश बीडकर हे जेलमधील कैद्यांना जेवणाचे डबे घेऊन आले. जेवण देणारा ठेकेदार रमेश पिसे याच्यामार्फत जेवण देत असताना जेलच्या प्रवेशद्वारावरच पकडले. 

त्याच्याकडे असलेल्या डब्यांच्या पिशवीची तपासली केली असता, डब्यात सुक्के उकडलेले चिकन व रश्‍याचे भरलेले पाच डबे आढळून आले.मयतांच्या नातेवाईकांनी तातडीने तहसीलदारांना घटनास्थळी बोलावून या डब्यांचा पंचनामा करण्याचा आग्रह धरला. मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने तहसीलदारांनी देखील सर्वांच्या समक्ष पंचनामा करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.