श्रीनाथ सोसायटीतील १ कोटी १३ लाखांच्या अपहार प्रकरणातील आरोपींना कोठडी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर तालुक्यातील वडगांव गुप्ता येथील श्रीनाथ मल्टीस्टेट अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटीत सुमारे १ कोटी १३ लाख ५४ हजार रुपयांचा अपहार प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात सात जणांना मंगळवारी अटक केली. अटक केलेल्यांना बुधवारी (दि. २७) न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दि. २ जुलैपर्यंत पाच दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वडगाव गुप्ता येथील श्रीनाथ मल्टिस्टेट अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटीत आठ वर्षांपूर्वी ते दि. २७/११/२०१७ या कालावधी दरम्यान सभासदांची ठेव रक्कम सुमारे १ कोटी १३ लाख ५४ हजार दोन रुपयांचा गैरव्यवहार होऊन अपहार झाला. 

Loading...
याबाबत सौ. अरुणा सुनील पाटील (रा. विळद घाट, ता. नगर, जि. अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात एमपीआयडी ॲक्ट क ३ प्रमाणे एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पो. नि. ए. एस. भुसारे यांचेकडे देण्यात आला आहे. 

या गुन्ह्यात मंगळवारी (दि. २६) गजानन निवृत्ती डोंगरे, शंकरराव रामभाऊ धुमाळ, बाबासाहेब रामचंद्र करांडे, बाळासाहेब एकनाथ आंबेडकर, दत्तात्रय मनोहर गिते (सर्व रा. वडगाव गुप्ता, ता. नगर) चंद्रभान भगवंत काळे (रा. देहेरे, ता. नगर) आणि रामदास रानबा गिते (रा. नवनागापूर ता. नगर) यांना अटक करण्यात आली. 

सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. मंगेश दिवाणे यांनी यावेळी युक्तीवाद केला. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून यात मोठ्या रकमेचा अपहार झाला आहे. यातील अपहाराची रक्कम सुमारे १ कोटी १३ लाख ५४ हजार दोन रुपये हस्तगत करावयाचे आहेत. 

या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास करावयाचा आहे. तरी आरोपींना दहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी न्यायालयात करण्यात आली. न्यायालयात आरोपींच्यावतीनेही युक्तीवाद करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकूण आरोपींना दि. २ जुलैपर्यंत पाच दिवसाची पोलिस कोठडी दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.