साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांना राज्यमंत्री दर्जा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांना राज्य सरकारने राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. राज्य सरकारच्या विधि व न्याय विभागाने याविषयीचा शासन निर्णय नुकताच जारी केला. राज्यमंत्री दर्जा प्रदान केल्यामुळे त्यांना शासकीय समारंभात मानाचे स्थान, समितीच्या मुख्यालयात कार्यालय, दौऱ्यावर असताना शासकीय वाहन व निवास व्यवस्था, मासिक मानधन व विविध भत्ते मिळतील.
Loading...
सुरेश हावरे यांनी संस्थानचे अध्यक्ष म्हणून काम करताना सामाजिक कार्यावर भर दिला आहे. लोकसहभागातून शिर्डीच्या स्वच्छतेसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. शिर्डीला आलेल्या भक्तांनी रक्तदान करावे यासाठी त्यांनी मोहीम सुरू केली व त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमात राज्यातील विविध रक्तपेढ्या सहभागी झाल्या. राज्यातील हजारो रुग्णांना लाभ झाला. शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्ष म्हणून काम करण्यापूर्वी त्यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम केले आहे. हावरे हे प्रथितयश उद्योजक व बिझनेस लीडर आहेत.

त्यांना भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरमधून न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तसेच त्यांनी डिपार्टमेंट ऑफ ॲटोमिक एनर्जीमध्ये 27 वर्षे वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ म्हणून काम केले आहे. ते नागपूर विद्यापीठातील इंजिनिअरिंगमधील सुवर्णपदक विजेते आहेत. परवडणारी घरे याविषयी संशोधन करून त्यांनी मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.