तीर्थक्षेत्र विकास निधीत गैरव्यवहार करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बेलापुर (ता.श्रीरामपूर) जि.प. गटात सन 2014-15 वर्षात तीर्थक्षेत्र विकास कामाच्या निधीत गैरव्यवहार करणारे अभियंता, उप अभियंता व जिल्हा परिषद सदस्य यांच्यावर राजकीय दबावापोटी कारवाई होत नसल्याने संबंधीतांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केले.

या उपोषणात पं. स. सदस्य सुधीर नवले, अरुण नाईक, मा.उपसरपंच रविंद्र खराडे, सरपंच भरत साळुंके, ज्ञानदेव वाबळे, सुरेश वाघ, अनिलराव बौबळे, किरण भांड, अनिल नवले, अय्याज सय्यद, जावेद शेख, दिवाकर कोळसे, शिवाजी वाबळे, बाळासाहेब लगे, अशोक गवते, सिताराम गायकवाड, किशोर बोरुडे, बंटी शेलार, गोकुळ कुताळ, परिक्षीत नवले, समीर नवले, ज्ञानेश्‍वर नवले आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

Loading...

बेलापुर (ता.श्रीरामपूर) जि.प. गटातील सन 2014-15 या वर्षात तीर्थक्षेत्र विकास निधीतून बिरोबा मंदिर, मारुती मंदिर व समाज मंदिर बांधण्याचे काम दाखविण्यात आले. जि.प. सदस्य शरद नवले, अभियंता विलास जगधने व उप अभियंता खाजेकर यांनी संगनमताने या कामाचा निधी हडप करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली. 

याद्वारे सुमारे शासनाच्या 8 लाख रुपयांचे नुकसान करण्यात आलेले आहे. सदर जागा खाजगी मालकीची असून, त्या जागेचा सातबारा उतारा ग्रामपंचायत नमुना नं.8 वर वडिलोपार्जीत आहे. या जागेच्या कागदपत्राचा नमुना बनावट तयार करुन ग्रामपंचायतच्या जागेत काम दाखविण्यात आले आहे.

मात्र सदरील काम गावाच्या लोकवर्गणीतून झालेले आहे. संबंधीतांनी ग्रामपंचायतला अंधारात ठेवून बनावट कागदपत्रे तयार केली आहे. गोखलेवाडी येथील मारुती मंदिर शेतीमहामंडळ मालकीच्या जागेत बांधकाम केले असून, याची परवानगी घेण्यात आलेली नाही. 

या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल उप अभियंता यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे सुपुर्द केला असून, यामध्ये संबंधीत व्यक्ती दोषी आढळत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. राजकीय दबावापोटी अभियंता, उप अभियंता व जिल्हा परिषद सदस्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी उपोषण सुरु करुन, संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

या उपोषणाला श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष करण ससाणे, मा.कमेटी सभापती सचिन गुजर, जि.प. सदस्य बाबासाहेब दिघे, पं.स. सदस्य वंदना मुरकुटे आदीनी भेट देवून उपोषण कर्त्यांशी चर्चा केली. तर जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने यांनी संबंधीतांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्याने संध्याकाळी उशीरा उपोषण सुटले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.