शिवशाहीचा प्रवास आरामदायी नव्हे, डोकेदुखी वाढविणारा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिवशाही बसेस्‌चा आरामदायी प्रवास डोकेदुखी निर्माण करणारा होत असल्याची तक्रार प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड यांनी केली आहे.एसटी खात्याने मोठ्या प्रमाणावर खासगी कंपनीच्या शिवशाही बसेस्‌ सर्वत्र सुरू केल्या आहेत. या बसेस्‌मुळे प्रवास आरामदायी होईल असे वाटत होते. परंतु, तो भ्रमनिरास झाला आहे. 

Loading...
बसेस्‌ वेळेवर न सुटणे, नियोजित ठिकाणी लालपरी बसेस्‌पेक्षाही उशिरा पोहोचणे यामुळे डोकेदुखी ठरत असल्याने भरमसाठ भाडे देऊन देखील तक्रारी वाढत आहेत.याबाबत रणजीत श्रीगोड यांनी एसटी खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे चर्चा केली व लक्ष वेधले. या बसेस्‌चे चालक हे खासगी कंपनीचे असल्याने त्यावर एसटीचे नियंत्रण राहिले नाही. 

या बसेस्‌ला एसटीतर्फे वाहक व डिझेलचा पुरवठा देण्यात येतो. उदा. श्रीरामपूर-पुणे या मार्गावर 378 कि.मी. अंतरास 100 लीटर डिझेल दिले जाते. या खासगी कंपनीला 18 रुपये 1 कि.मी. अंतरास भाडे दिले जाते. बसचे उत्पन्न कमी आले तरी 18 रुपयांप्रमाणे भाडे देण्याचे एसटीला बंधन आहे. बसेस्‌ वेळेवर सोडणे, पोहचविणे याबाबत दक्षता घेण्याचे लेखी निवेदन देण्यात आले आहे.

असा प्रयोग प्रथमच सुरू करण्यात आला आहे. यामागे एक छुपी शक्ती असल्याचा संशय येत आहे. सवलत मूल्य, पोलीस कर्मचारी प्रवास, शेतकरी मेळावा यासाठी राज्य शासनाकडून 725 कोटी 94 लाख 16 हजार रुपये एसटीला येणे बाकी आहे, हे स्पष्ट झाले आहे.

राज्य शासनाने सदर रक्कम त्वरित एसटी खात्याला अदा करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे, असे सचिव अनिल कुलकर्णी यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.