कर थकबाकी, बेशिस्त वाहतूक आणि अतिक्रमणांविरोधात आता महापालिकेची धडक कार्यवाही !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर थकबाकी वसूली, शहर स्वच्छता, महापालिका हद्दीत वाहतुकीला शिस्त आणि महापालिका क्षेत्रात तसेच हद्दीतील महामार्गावरील अतिक्रमणांवर धडक कार्यवाही करण्याबाबत आता महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. याबाबत सुरु असणारी कार्यवाही यापुढे तीव्र करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

यासंदर्भात, श्री. द्विवेदी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विविध यंत्रणा प्रमुखांची बैठक घेऊन कार्यवाहीचे निर्देश दिले. अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त प्रदीप पठारे, नगररचनाकार संतोष धोंगडे, बांधकाम विभागाचे विलास सोनटक्के, प्रकल्प विभागाचे प्रमुख श्री. मेहेत्रे, अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे, आरोग्य अधिकारी श्री. पैठणकर, मुख्य लेखा अधिकारी श्री. मानकर, कर संकलन अधिकारी कैलास भोसले यांच्यासह चारही प्रभाग समित्यांचे प्रभाग अधिकारी, करनिरीक्षक आणि स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.


                      

यावेळी श्री. द्विवेदी यांनी चारही प्रभाग अधिकाऱ्यांकडून कर थकबाकीवसूलीचा आढावा घेतला. ज्यांच्याकडे जास्त प्रमाणात थकबाकी आहे, त्यांच्याकडून ती तातडीने वसूल करण्याची कार्यवाही कऱण्याचे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांनी त्यांच्याकडील थकबाकी महापालिकेकडे जमा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

महापालिकेमार्फत नागरिकांना चांगल्या सुविधा द्यायच्या असेल, विकासकामे करावयाची असेल तर कर वेळेवर भरणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा थकबाकीदारांकडून वसुलीची कार्यवाही करा. 

मागील 12 दिवसांत महापालिकेकडे केवळ 1 कोटी 84 लाख रुपयांची थकबाकी जमा झाली आहे. संबंधित बड्या थकबाकीदारांना नोटीसा दिल्या असतील तर जप्तीची कार्यवाही सुरु करा, असे निर्देश त्यांनी दिले.

Loading...
महापालिका अधिकाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने काम करावे, यासंदर्भात कोणताही दबाव घेण्याची गरज नाही. कायद्याप्रमाणे कार्यवाही करा, असे श्री. द्विवेदी यांनी सांगितले. पुढील 15 दिवसांत थकबाकी वसुलीचे प्रमाण प्रत्येक प्रभागात वाढले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शहरात विविध ठिकाणी पे एन्ड पार्क, नो पार्कींग, पार्किंग झोन करण्यात येणार आहेत. यासंदर्भात अधिकाधिक नागरिकांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी आणखी 10 दिवसांची मुदत देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी शहरातील वाहतुक सुरळीत करण्यासाठी त्यांचे म्हणणे मांडावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी धडक कार्यवाही करा. शहर स्वच्छतेचे काम सफाई कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित करुन घेण्याबरोबरच नागरिकांनी रस्त्यावर किंवा मोकळ्या ठिकाणी कचरा टाकला आणि शहर विद्रुप करण्याचा प्रयत्न केला तर अशा नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी स्वताहून पुढाकार घेतला पाहिजे. ठिकठिकाणी असणारे अनधिकृत होर्डिंग्ज काढून टाका, दुकांनाच्या बाहेर कचरा पेट्या ठेवण्याबाबत संबंधित दुकानदारांना सूचना द्या. कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर कचरा टाकू नका, असे त्यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.