वाळूउपसा थांबवण्यासाठी ग्रामस्थांचा नदीतच ठिय्या !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :प्रवरा नदीतील करजगाव (ता. राहुरी) येथील बेकायदेशीर वाळूउपशाची महसूलने दखल न घेतल्याने कान्हेगाव येथील गावकऱ्यांनी सोमवारी नदीतच ठिय्या दिला. त्यामुळे उपसा थांबवण्यात आला. मात्र, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असल्याने कारण देऊन अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही. 

Loading...
बेकायदेशीर उपसा थांबवण्यात आल्यानंतर मोजमाप होऊ नये, म्हणून पढेगाव बंधाऱ्यात अडवलेले पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. पावसाळा सुरु झाल्याने वरच्या भागातील बंधाऱ्यांतील पाणी खाली सोडण्यात आले होते. मात्र, उपसा करणाऱ्यांनी पढेगाव बंधाऱ्याला फळ्या टाकून प्लास्टिक कागदाचा वापर करुन हे पाणी अडवले होते.

करजगाव येथे वाळूउपसा करता यावा म्हणून जलसंपदा विभागालाही वेठीला धरण्यात आले होते. नदीला पाणी येणार असल्याने आठ दिवसांपासून पोकलेन, जेसीबी लावून दिवस-रात्र उपसा सुरु होता. उपसा करताना गावकऱ्यांना दमबाजी केली जात होती.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेण्यासाठी गावकरी गेले. त्यांच्या आदेशानुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी जिल्हाधिकारी प्रशांत पाटील व तहसीलदार सुभाष दळवी यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

त्यामध्ये वाळूउपशाचे मोजमाप करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मोजमाप गुपचूप करण्यात आले. तक्रार केल्यावर राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांनी फेरमोजमाप करण्याचे स्पष्ट केले. कान्हेगाव हद्दीत वाळूउपसा सुरु झाल्याने पंचनामे करण्याचे तहसीलदार सुभाष दळवी यांनी मान्य केले.

तीन फुटांपर्यंतच उपसा करावा, असा नियम असताना १५ ते २० फूट उपसा करण्यात आला. तक्रारी करुनही दखल घेण्यात आली नव्हती. अखेर सोमवारी गावकरी नदीपात्रात गेले. त्यांनी कान्हेगाव हद्दीत ठिय्या मांडला. ते बघताच पोकलेन व मालमोटारी घेऊन उपसा करणारे निघून गेले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.