तमाशा कलावंत झाला पोलीस फौजदार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  तमाशाच्या राहुटीतच जन्म झाल्याने शिक्षणाचा श्रीगणेशा तेथूनच झाला. शाळेला सुटी असली की, तो रंगमचावर नृत्य करायचा. जनतेच्या मनोरंजनासाठी सोंगाड्या व्हायचा. अपार कष्ट करत शिक्षण पूर्ण करून आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सविंदणे (ता. शिरूर) येथील दिनेश मधुकर सकट तमाशा कलावंत आता फौजदार झाला आहे. 

आई नंदा सकट या नृत्यांगणा होत्या. आठ महिने तमाशात रोजंदारी मिळायची. आई दिनेशला शिक्षणासाठी आग्रह धरायची. होती. त्यातून दिनेश २००९-१० मध्ये बारावी उत्तीर्ण झाला. दरम्यानच्या काळात आईला मदत म्हणून तो तमाशात डान्सर, सोंगाड्या व वादक म्हणून काम करू लागला.

Loading...
रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर, दत्ता महाडिक पुणेकर, सर्जेराव जाधव या मोठ्या तमाशात त्याने काम केले. तमाशात काम करता करता त्याने पाबळ येथून बी. कॉमची पदवी मिळवली. पदवीपर्यंतचा त्याचा शिक्षणाचा प्रवास अतिशय खडतर होता.

अनेक संकटांना सामोरे जावे लागले. २०१६ मध्ये आईच्या निधनाने या कुटुंबावर मोठे संकट कोसळले. तमाशामध्ये काम न करता मुलाने मोठा अधिकारी व्हावे, अशी आईची इच्छा होती. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरु केला.

पुण्यातील काही मित्रांनी मदत केली. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर परीक्षा उत्तीर्ण होऊन दिनेश पोलिस उपनिरीक्षक बनला. तमाशा कलावंताला जनतेच्या मनोरंजनासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो. तमाशा फडांना उतरती कळा लागल्यामुळे तमाशा कलावंताना फटका बसला. अशा परिस्थितीत दिनेशने शिक्षणाच्या जोरावर अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले.

ही तमाशा कलावंतासाठी गौरवाची बाब असल्याचे तमाशा फडमालक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी सांगितले. तमाशात कला सादर करताना अऩेक बरे-वाईट अनुभव आले. त्यातून मार्ग काढून आईचा आशीर्वाद असल्यानेच तिचे स्वप्न पूर्ण करू शकलो.

अधिकारीपदाचा वापर योग्य पद्धतीने करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देईन, असे दिनेशने बोलताना सांगितले. दिनेश सकटची यशोगाथा गावकऱ्यांकडून दिनेशचे कौतुक लहानशा घरात राहाणारा आणि कष्ट करून शिक्षण घेणारा दिनेश सकट पोलीस निरीक्षक झाल्याचा आनंद सविंदणेकरांना झाला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या दिनेशचे गावकऱ्यांनी भरभरून कौतुक केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.