पाणी न मिळाल्याने उसाचे उभे पीक टाकले नांगरून.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मुळा पाटबंधारे विभागाच्या उजव्या कालव्याच्या अंतिम भागात (टेल) सुकळी (ता. नेवासा) येथे पाटपाणी न मिळाल्याने शेतकरी सुभाष लक्ष्मण गुंड यांनी पाण्याअभावी जळून गेलेला ऊस नांगरून टाकला. त्यांच्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांचीही अशीच अवस्था झाल्याने आता पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीच्या भरपाईसाठी न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती कृष्णा भाऊसाहेब साबळे यांनी दिली.

Loading...
कृष्णा साबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले, की सुकळी हे गाव मुळा उजव्या कालव्याचे शेवटाला येते. पाटबंधारे डी.वाय. ४ मधील मायनर १मधून चारीद्वारे पाणी शेतीला देण्यात येत असते. या गावातील दुर्गामाता पाणीवापर सहकारी संस्थेने पाटबंधारे खात्याकडे ४५० एकरासाठी पाण्याची मागणी नोंदवलेली होती. ४० दिवसांचे रोटेशन सुरू झाल्यापासून आम्ही सर्व शेतकरी टेलचे भागात पाणी सोडा, अशी मागणी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींकडे करीत होतो.

या टेलचे भागात गेल्या ३ वर्षापासून पाटपाण्याचे नियोजनच होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले; परंतु प्रत्यक्षात टेलच्या भागात दररोज प्रतिक्षा करून पाणीच सोडले गेले नाही. लोकांत ओरड होत आहे, असे बघून अधिकाऱ्यांनी ८ जून रोजी दुर्गामाता पाणीवापर संस्थेला पत्र दिले. उन्हाळी आवर्तनाचे पाणी १० जून या शेवटच्या दिवशी चारीत सोडले. परिणामी पाटपाणी फक्त बाऱ्यापर्यंत आले व बंद झाले.

४५० एकर क्षेत्रापैकी अवघ्या ४ ते ६ एकरात पाणी कसे बसे गेले आणि रोटेशन बंद झाले. त्यामुळे १५० ते २०० शेतकरी पाटपाण्यापासून वंचित रहिले. मोठे आर्थिक नुकसान झाले. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे जळून गेलेला ऊस नांगरून टाकावा लागला. आता मात्र पाटबंधारे विभागाला अद्दल घडविण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावून पाटबंधारे खात्याला वठणीवर आणण्याची शेतकरी भूमिका असल्याचे कृष्णा साबळे यांनी या लेखी निवेदनात म्हटले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.