अन्याय झालेल्या बहुरूपी आबा शिंदेला आ.बाळासाहेब थोरातांकडून आधार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पोरधरी अफवेमुळे संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे मारहाण झालेल्या झरेकाठी येथील बहुरुपी कलाकार आबा शिंदे यांना आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयाकडून आधार मिळाला. आमदार थोरात यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यामुळे शिंदे यांचे डोळे पाणावले. 

Loading...
यशोधन संपर्क कार्यालयात नामदेव कहांडळ, विजय हिंगे यांनी आबा शिंदे यांना बोलावून त्यांची चौकशी करत सन्मान केला. या वेळी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, नारायण कहर, आबा यांची आई, भास्कर खेमनर, पुंजाहरी दिघे, अनिल सोमणी, रमेश नेहे, अजित सरोदे, सचिन खेमनर आदी उपस्थित होते.

राज्यात सध्या सर्वत्र पोरधरी टोळीच्या अफवा पसरल्या असून अनेक जण त्याचे बळी ठरत आहेत. मागील आठवड्यात समनापूर येथे अशाच गैरसमजातून झरेकाठी येथील बहुरुपी आबा शिंदे यांना मारहाण झाली. हे समजताच आमदार थोरात यांच्या यशोधन कार्यालयातून त्यांची आस्थेवाईक विचारपूस केली.त्यांची जीवनपट ऐकताना अनेकांना गहिवरून आले.

आमदार थोरात यांनी कायम कलावंतांचा सन्मान केला असून आबा यांचाही सत्कार या वेळी करण्यात आला.या वेळी विजय हिंगे म्हणाले, आबा शिंदे हा आश्वी पंचक्रोशीत लोकप्रिय असून तो गुणी कलाकार आहे. गरीब परिस्थितीमुळे तो बहुरुपी होऊन कला सादर करतो. त्याला शासकीय मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार थोरात प्रयत्नशील आहेत.

बहुरुपी दारोदार फिरत उदरनिर्वाह करतात. त्यांच्यावर गैरसमज व अफवांमुळे हल्ले होत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. संबंधित व्यक्तीची चौकशी करून त्यांना वागणूक द्यावी, असे आवाहन आमदार थोरात यांनी जनतेला केले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.