प्रवरा शिक्षण संस्थेच्या अकरावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देणार - ना.राधाकृष्ण विखे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गुणवत्तावाढीसाठी प्रायोगिक तत्वावर या वर्षी अकरावीतील मुलांना टॅब देणार असल्याचे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहामध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांसमवेत झालेल्या सहविचार सभेत ना. विखे पाटील बोलत होते. 

Loading...
ना. विखे पाटील म्हणाले,आज जागतिकस्तरावर ज्ञानाच्या कक्षा वेगाने विस्तारत असताना शिक्षकांवर अवलंबून राहण्याचे दिवस आता संपले असले तरी क्लासेसवर होणारा अमाप खर्च खेड्यातील पालक पेलवू शकतीलच असे नाही. म्हणूनच मुलांच्या शिक्षणासाठी प्रसंगी कर्ज काढणाऱ्या पालकांवर नैराश्य येऊ नये यासाठी आता प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेला पुढाकार घेऊन जागतिक स्पर्धेला सामोरे जाऊ शकतील, असे विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी घ्यावी लागेल.

याप्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, ज्येष्ठ संचालक आबासाहेब खर्डे, के.पी. नाना आहेर, भागवत घोलप, अण्णासाहेब भोसले, ज्ञानदेव म्हस्के, बाबुराव कडू, संजय जोशी, किशोर नावंदर, शशिकांत घोलप, आप्पासाहेब दिघे, सोपान दिघे, बन्सी तांबे, तुकाराम बेंद्रे यांच्यासह संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, सहसचिव भारत घोगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. ना. विखे पाटील म्हणाले, ग्रामीण समाजातील प्रत्येक तरुण ज्ञानाने समृध्द व्हावा या धारणेतून पद्मश्री विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना केली.

आजच्या जागतिक बदलाला सामोरे जाण्यासाठी भावी पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षणाची असून आता गुणांवर आधारित शिक्षण व्यवस्था संपलेली असून गुणवत्ताधारीत शिक्षण गरजेचे आहे. प्रत्येक विद्यालयातून लोकसहभाग वाढविणे गरजेचे आहे.

याप्रसंगी माजी मंत्री म्हस्के पाटील, महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षणाधिकारी प्रा. शिवाजी रेठरेकर आणि डॉ. संपतराव वाळुंज यांनी शैक्षणिक योजनांची माहिती सांगितली. डॉ. हरिभाऊ आहेर यांनी आभार व्यक्त केले. दिनेश भाने यांनी सूत्रसंचालन केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.