शिर्डीतील विकास कामांना मुठमाती देत विदर्भाच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे असलेल्या साईसंस्थानच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून साईबाबांच्या शिर्डीनगरीतील विकास कामांना व पायाभूत सुविधांना मुठमाती देत विदर्भाच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी दिला. त्यासाठी सरकारने हावरे यांना राज्यमंत्री पदाऐवजी कॅबीनेट मंत्रीपदाचा दर्जा बहाल केला पाहीजे, अशी उपोरोधात्मक टिका शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी केली.

Loading...
शिर्डी नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, साईबाबांच्या झोळीत देश विदेशातील साईभक्त भक्तीभावाने व श्रद्धेने दान अर्पण करित असतात. भाविकांच्या या दानातून साईंची झोळी खचाखच भरलेलीही असते. मात्र, या झोळीत आलेल्या दानातून साईभक्तांसाठी शिर्डी आणि परिसरात पायाभूत सुविधा निर्माण व्हावीत ही माफक अपेक्षा साईभक्तांची असते. साईभक्तांच्या या अपेक्षांना साईसंस्थानचे अध्यक्ष हावरे आणि त्यांच्या सहकारी विश्वस्तांनी हरताळ फासण्याचे काम दोन वर्षात केले आहे.

साईबाबा समाधी शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हावरे यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या. दोन वर्षांत त्यांनी केलेली एकही घोषणा प्रत्यक्षात बघायला मिळाली नाही. साईसंस्थानची दोन रूग्णालये आहेत. पूर्वीच्या विश्वस्त मंडळाच्या काळात साई संस्थानच्या रूग्णालयाचा प्रचार व प्रसार देशभर झाला होता. हावरे अध्यक्ष झाल्यानंतर या दोन्ही रूग्णालयांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशीच झाल्याचे दिसत आहे. साई संस्थानच्या रूग्णालयात औषधे व डॉक्टरांची वाणवा असताना तेथे लक्ष देवून उपाययोजना करण्याऐवजी विदर्भातील शासकीय मेडिकल कॉलेजचा जिर्णोद्धार कारायला हावरे निघाले आहेत. 

साईबाबांच्या तिजोरीतील १५०० कोटी रूपये विदर्भातील आपल्या पक्षाच्या वाढीसाठी हावरेंना पळवायचे आहेत.. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनाही हावरेंनी सोडले नाही. जावडेकर साईभक्त आहेत. ते शिर्डीत आले असता त्यांना आपण एका वर्षात काय काय कामे केली यांचा लेखाजोखा असलेली फसवी पुस्तिका दाखवली. 

तसेच मी विदर्भातील लोकांच्या कल्याणासाठी साईसंस्थानच्या तिजोरीतून करोडो रूपये दिले. पक्षासाठी किती काम करतो. शिर्डीत शैक्षणिक विकास केला. हॉस्पिटलची निर्मिती केली. तरीही लोक माझ्या नावाने टाहो फोडतात. मग जावडेकर यांनी साईंच्या दर्शनानंतर पत्रकार परिषद घेवून हावरे यांनी दोन वर्षात शिर्डीचा चेहरा मोहराच बदलून टाकल्याने आज शिर्डीत लाखो साईभक्त येवू लागले आहेत. साईभक्तांसाठी हावरे यांनी वातानुकुलीन दर्शन रांग बनवली, असल्याचे सांगितले. 

अर्थात या सर्व बाबींशी हावरे यांचा काडीचाही संबंध नाही. दर्शन क्यु प्रकल्प अजून कागदावरच आहे. हॉस्पिटल व शैक्षणिक प्रकल्प या पूर्वीच्याच विश्वस्तांनी निर्माण केली. असे असताना हावरे स्वत:चा उदोउदो करण्यासाठी स्वत:च्या पक्षातील वरिष्ठ मंत्र्यांना बनवतात, तर मग साईभक्त आणि शिर्डी ग्रामस्थ त्यांच्या दृष्टीने शुल्लकच आहेत. अशा हावरेंना सरकारने राज्यमंत्री नाही, तर कॅबीनेटचाच दर्जा बहाल करावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे कोते यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.