विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथील प्रगतशील शेतकरी व वारंकरी साप्रंदायाचे बाबुराव सोन्याबापू जुंधारे (वय ७१) यांचा विजेचा जोरदार धक्का बसल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी दुपारी प्रवरातिरी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 

Loading...
गुरुवारी सकाळी बाबुराव जुंधारे हे साडेनऊ वाजेच्या सुमारास शेतात गेले होते. यावेळी विद्युत पंपाच्या खोक्याजवळ विजेचा जोरदार धक्का बसून ते खाली कोसळले. त्यामुळे त्यांचे नातू रोहित जुंधारे यांनी त्यांना बाजूला करत शेजारी राहणाऱ्या लोकांच्या मदतीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. 

जुंधारे यांची प्रकृती खालावत चालल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु शनिवारी सकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास अखेर त्यांचे निधन झाले. जुंधारे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार भाऊ, एक बहिण असा मोठा परिवार असून येथील विधीज्ञ सुनील जुंधारे यांचे ते वडील होते.

शनिवारी दुपारी उंबरी-बाळापूर येथील प्रवरातिरी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जुंधारे हे पंचक्रोशीत आपल्या मनमिळावू स्वभाव व नेहमी मदतीसाठी धावून येणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रसिध्द असल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी ग्रामस्थ, नातेवाईक, वारकरी सांप्रदाय व मांचीहिल मित्रपरिवारासह आजूबाजूच्या गावातील नागरिक उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.