संतप्त महिलांनी सरपंचासह ग्रामसेवकास कोंडले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिराळ (चिचोंडी), ता. पाथर्डी येथे गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असताना त्याकडे ग्रामपंचायतने दुर्लक्ष केल्याने गावातील संतप्त महिलांनी ग्रामपंचायत बसलेले सरपंच, ग्रामसेवक व इतर पदाधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडले. जोपर्यंत पाण्याचे देण्याचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत कार्यालयाचे कुलूप उघडणार नसल्याची भूमिका या वेळी महिलांनी घेतली. 

Loading...
याबाबत समजलेली माहिती अशी की, शिराळ गावाला मिरी -तिसगाव नळयोजनेचे पाणी मिळत असल्याने ग्रामपंचायतच्या विहिरीतील पाण्याचा वापर होत नव्हता, त्याचाच फायदा उचलत एका शेतकऱ्याने थेट ग्रामपंचायतच्या विहिरीवरच कब्जा करून ग्रामपंचायत मालकीच्या विहिरीचे पाणी गावाला न देता स्वत:च्या शेतीला वापर असल्याची गावात चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी मिरी -तिसगाव नळयोजनेची पाईपलाईन फुटल्याने या योजनेचा पाणीपुरवठा बंद झाला. त्याचबरोबर ग्रामपंचायत मालकीच्या विहिरीचे पाणी गावाला मिळत नसल्याने पिण्यासाठी पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न गावातील महिलांना पडला. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले ग्रामपंचायतमध्ये बसलेले सरपंच महादेव कराळे, युवानेते वैभव खलाटे, ग्रामसेवकासह इतर पदाधिकाऱ्यांना या माहिलांनी बाहेरून कुलूप लावून कोंडून घेतले.

या वेळी वैभव खलाटे यांनी उपस्थित महिलांशी चर्चा करत शिराळ गावचा आ. शिवाजी कर्डिले यांच्या प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश केला असून, लवकरच या प्रस्तावास मंजुरी मिळून कामास सुरुवात होईल तसेच मिरी -तिसगाव नळयोजनेचे पाणी तत्काळ सुरू होणार असल्याने पाणीटंचाई निश्चित दूर होईल, असे सांगितल्याने चित्रा गुगळे, मुक्ताबाई गडाख, अबिदा शेख, उषा खलाटे, चंद्रकला गोरे, रंजना पाथरकर, द्वारका जावळे, अनिता घोरपडे, संगीता घोरपडे यांच्यासह सर्व महिलांनी ग्रामपंचायतला लावलेले कुलूप उघडले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.