सरकारच्या कार्यपद्धतीवर जनतेतून समाधान : खा.दिलीप गांधी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाजपा शासनाने विविध कायदे व नियम तयार करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम केले आहे. प्रत्येक निवडणूक ही एक प्रकारची संधी असते, त्यामाध्यमातून मतदारांशी थेट संबध येत असतो. भाजपा सरकारने आगामी लोकसभेची तयारी जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून सुरू केली असून, ही माहिती तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम करत असल्याचे मत खा. दिलीप गांधी यांनी व्यक्त केले. 

 खा. दिलीप गांधी पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी जनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने तालुक्यातील पत्रकारांशी वार्तालाप केला, यावेळी ते बोलत होते. या वेळी अर्बन बँकेचे विजयकुमार मंडलेचा, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, शेवगावचे सुनील रासणे, नगरसेवक कमलेश गांधी, अर्जुन धायतडक आदी उपस्थित होते.

Loading...
केंद्र व राज्य सरकारने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून, सरकारच्या कामावर जनतेने समाधान व्यक्त केले आहे. शासनाने प्रत्येक क्षेत्रात पारदर्शकपणा आणल्यामुळे समाजातील गरीब व श्रीमंत ही दुरी कमी होत आहे. सरकारने शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, बँकिंग, औद्यागिकीकरणाध्ये भरीव काम केले आहे.

जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्हा तीन वषांर्पासून टँकरमुक्त झाला आहे. यावर्षी दक्षिण जिल्ह्यातील दोन गावांचा अपवाद वगळता आजही जिल्हा टँकरमुक्त आहे. जिल्ह्यात जलयुक्तचे भरीव काम झाले आहे. महिलांना उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळाला आहे. तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत आहे.

नोटबंदीमुळे देशातील भ्रष्टाचाराचे उच्चाटन झाले आहे. यामुळे प्रामाणिकपणा रुजवण्याचे काम झाले असून, पारदर्शकतेत वाढ झाली आहे. गरिबांसाठी सुमारे एक कोटी घरे बांधली असून, चार वर्षात 1.69 लाख किलोमीटरचे ग्रामीण रस्ते बांधण्यात आले आहेत. आरोग्य विमा कार्यक्रमाच्या माध्यमातून 50 कोटी नागरिकांना लाभ झाला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी विशिष्ट कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना 12.5 कोटी मृदा कार्डचे वाटप करण्यात आले आहे. नुकताच शासनाने ऊस पिकाबाबत चांगला निर्णय घेतला असून, 29 रुपयांपेक्षा कमी दराने कारखान्यांना साखर विकता येणार नाही. यामुळे कारखान्यांना शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव देण्यास अडचणी येणार नाहीत. एकंदर शासनाच्या कार्यपद्धतीवर जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.