सरपंचाच्या कामकाजात लुडबूड केल्यास कारवाई !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ग्रामपंचायत स्तरावर सरपंच पद अत्यंत महत्वाचे असून, गावच्या सर्वांगिण विकासासाठी सरपंचपदाची निवड थेट जनतेतून झाली आहे. म्हणूनच सरपंचांना कारभार करण्यास पूर्णपणे मोकळिकता द्यावी, त्यांच्या कारभारात कोणीही लुडबूड करु नये, हस्तक्षेप करु नये, तसे झाल्यास नियमाप्रमाणे संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगर तालुका पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांनी दिला आहे.

Loading...
सरपंच पद सांभाळताना अनेकांचा दबाव असतो. सरपंचांचे नातेवाईक, मित्रमंडळी त्यांच्या कामकाजात लुडबूड करतात. परिणामी सरपंच म्हणून संबंधित व्यक्ती अथवा महिलेला सक्षमपणे काम करताना अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येते. याच पार्श्वभूमीवर सरपंचांच्या कामकाजात हस्तक्षेप करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव नगर तालुका पंचायत समितीने संमत केला आहे.

अशा प्रकारचा ठराव राज्यात पहिल्यांदाच झाला आहे. या ठरावामुळे सरपंचांना काम करताना निश्चितपणे पाठबळ मिळणार आहे. ज्या-ज्या ठिकाणी महिला सरपंच आहेत, त्यातील जवळजवळ ५० टक्के महिलांचा कारभार त्यांचे नातेवाईकच करताना आढळून येत आहे.

वास्तविक पाहता महिलाही सक्षमपणे गावचा कारभार करु शकतात. मात्र त्यांना स्वतंत्र कारभार करण्याची संधी नातेवाईकांनी द्यायला हवी. दुर्दैवाने तसे घडत नाही. केबिनमध्ये सरपंच अन् ॲन्टी चेंबरमध्ये त्यांचे नातेवाईक बसून सूत्रे हलवितात. असा प्रकार आढळून येत आहे. परिणामी महिला सरपंचपदाचे काम करण्यापासून वंचित आहेत. नुसतेच नावाला सरपंचपद, असेच चित्र आहे.

सरपंचपदाचे कार्यालय, त्यांची खुर्ची तोलामोलाची असते. त्या खुर्चीवरही इतर जण अतिक्रमण करून त्यावर बसतात, ही मोठी दु:खाची बाब आहे. हा सारा प्रकार थांबविण्यासाठी व पुरुष आणि महिलांनाच त्यांच्या सरपंच पदावर प्रभावीपणे काम करण्यासाठी नगर तालुका पंचायत समितीने नियमाप्रमाणेच गंभीर पावले उचलली आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.