भानुदास कोतकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  केडगाव येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या भानुदास कोतकर यांच्यावतीने न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर होणारी सुनावणी दि. २ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. कोतकर यांच्यावतीने ॲड. महेश तवले यांनी न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी न्यायालयात केली.

Loading...
केडगाव हत्याकांड प्रकरणी भानुदास कोतकर यांना अटक झाली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. कोतकर यांच्यावतीने जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी.इनामदार यांच्यासमोर जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर शुक्रवारी (दि.२२) सुनावणी ठेवण्यात आली होती.

यावेळी कोतकर यांच्यावतीने ॲड. महेश तवले यांनी न्यायालयात सांगितले की, तपासी अधिकारी यांनी आरोपी कोतकर यांच्यावर ३३ गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली आहे परंतु आरोपींवर सन १९८६ पासून १३ गुन्हे दाखल असून, त्याची माहिती मिळण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांकडे माहिती अधिकारात अर्ज केलेला आहे.

ती माहिती मिळाल्यानंतर युक्तिवाद करणे योग्य होईल, त्यामुळे सदरकामी युक्तिवाद करण्यास मुदत देण्याची विनंती केली. यावेळी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल ॲड. केदार केसकर यांनी तीव्र आक्षेप घेतला. सरकार पक्षातर्फे दि.८ जून २०१८ रोजी कोर्टात म्हणणे दाखल केले आहे. मागील तारखेला दि. १३ जून रोजी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मुदत घेण्यात आली होती.

काल (दि.२२) गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी मुदत घेऊन या प्रकरणाची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा युक्तिवाद केला. न्यायालयाने आरोपी पक्षाची विनंती मान्य करून पुढील सुनावणी दि. २ जुलैला ठेवण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.