शनी शिंगणापूर ट्रस्ट सरकारच्या ताब्यात देण्यास हिंदू जनजागृती समितीचा विरोध !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शनिशिंगणापूर येथील शनैश्वर ट्रस्ट सरकारच्या अधिपत्याखाली आणण्यास हिंदू जनजागृती समितीने विरोध दर्शविला आहे. यापूर्वी जी मंदिरे सरकारने अशा पद्धतीने ताब्यात घेतली आहेत, तेथील भ्रष्ट कारभारासंबंधी काय कारवाई झाली, याचे उत्तर आधी द्यावे, अशी मागणीही करण्यात आली असून या विरोधात आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

Loading...
हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सरकारला हा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘काँग्रेस सरकारने अगोदर सरकारी खजिना रिकामा केला आणि त्यानंतर त्यांची वक्रदृष्टी हिंदू मंदिरांतील भाविकांच्या पैशावर पडली. हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण त्यांनी सुरू केले.

हज यात्रा आणि चर्चच्या विकासासाठी त्या निधीचा वापर केला. कर्नाटकातील निवडणुकांच्या वेळी भाजपने स्वतःच्या निवडणूक घोषणापत्रात हिंदूंची सरकारीकरण केलेली मंदिरे हिंदूंना परत करणार, अशी एक प्रमुख घोषणा केली होती.

महाराष्ट्रात मात्र हेच भाजपचे सरकार हिंदूंकडे असलेली मंदिरे काढून घेऊन त्यांचे सरकारीकरण करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निधर्मी सरकारला मंदिरे चालवण्याचा अधिकार नसून, केवळ तेथील व्यवस्थापनातील त्रुटी दूर करून ते मंदिर पुन्हा त्या त्या समाजाकडे परत देण्यास सांगितले आहे.

असे असतानाही भाजप सरकारने शिंगणापूर येथील शनैश्‍वर देवस्थानचे सरकारीकरण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा हिंदू जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध करीत आहे. हा निर्णय रद्द न केल्यास जनआंदोलन उभारले जाईल.’ असे सांगण्यात आले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.