श्रीगोंद्यात दूध दरवाढ व शेतीमाल हमीभावासाठी आंदोलन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव मिळावा व दूध खरेदी दरात वाढ करण्याची शेतक-यांची मागणी रास्त आहे.सरकारला शेतक-यांचे कष्ट,वेदना व समस्यांची जाणिव आहे.हे सरकार शेतक-यांची चेष्टा करीत आहे पण अन्नदात्या शेतक-याचा कोप या सरकारची गच्छंती करु शकतो. सरकारने शेतक-यांचा अंत न पाहाता त्यांच्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात अशी मागणी 'नागवडे' कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केली आहे.सरकारने दूध खरेदी दरात वाढ करावी व शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा तसेच ठरलेल्या हमीभावानुसारच शेतमालाची खरेदी करावी या मागण्यांसाठी शनिवारी (दि.2) सकाळी राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली ढोकराई चौकात रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, आश्वासने देण्यात माहीर पण कृतीशून्य व असंवेदनशील सरकारे केंद्रात व राज्यात सत्तेत असल्याने शेतक-यांच्या समस्या दिवसेंदिवस आणखी गंभीर बनत आहेत.दूध खरेदी दरात वाढ करण्याचा सरकारचा निर्णय केवळ 'अच्छे दिन' सारखीच सोलकढी थाप आहे.भाजीपाला व अन्य शेतीमालाचे भाव दिवसागणिक कमी होत आहेत.पण 'अच्छे दिन' चे स्वप्न दाखविणा-यांना शेतक-यांच्या प्रश्नांशी मतलब नाही ते उद्योगपतींना रेड कार्पेट टाकण्यात मग्न आहेत.

शेतकरी हा अन्नदाता,जगाचा पोशिंदा आहे त्याच्या समस्या व मागण्यांची सरकारने दखल न घेतल्यास या सरकारला सत्तेवर आणणारा हाच शेतकरी या सरकारला पायउतार करु शकतो याचे भान सत्ताबेभान सरकारने ठेवण्याची गरज आहे.शेतकरी सहनशील आहे म्हणून त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचा प्रयत्न सरकारने थांबवावा व दूधासह अन्य शेतीमाल व भाजीपाल्याचे दरात वाढ करुन शेतक-यांना दिलासा द्यावा असे आवाहन नागवडे यांनी केले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.