जामगावमध्ये बालमजुरीचा धक्कादायक प्रकार?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामगावमध्ये एका नेत्याच्या वाढदिवसानिमित्त गावात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांचा वापर करण्यात आल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. 

गावातील बाजार ओटे परिसरात चिमुकल्यांच्या हातात मोठे दगड उचलून घेवून, झाडूने साफसफाई करवून घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या बाबत एका सुज्ञ नागरिकाने फोटो काढून सोशल मिडियावर हा संदेश व्हायरल केला आहे. या प्रकरणावर बाल कल्याण विभाग व विविध सामाजिक संघटना काय भूमिका घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


पारनेरमधील राजकीयदृष्ट्या संवेदनशिल असलेल्या जामगाव येथे शुक्रवारी एका उद्योजकाच्या वाढदिवसाची तयारी सुरू होती. याबाबत अनेक दिवसांनंतर ठिकठिकाणचा परिसर स्वच्छ करण्यात येता होता. परंतु बाजार ओट्यांच्या परिसरात साफसफाई करताना पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मोठे दगड उचलण्यास व झाडूने साफसफाई करण्यास लावले जात असल्याचे फोटो व्हायरल झाले आहे. दर आठवड्याला भरणार्‍या बाजारातून शेकडो रूपये निधी गोळा केला जातो. परंतु साफसफाई मात्र चिमुकल्या हातांकडून करवून घेतले जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.

 बालअधिकारांचं उल्लंघन करणारी सर्वात असमर्थनीय आणि समाज म्हणून सर्वांना लाजवेल अशीच ही घटना आहे. ज्या हातात पेन, पेन्सील असणे आवश्यक असताना स्वच्छतेसाठी वापर करण्यात आला. वाढदिवसांवर लाखोंची उधळपट्टी करणार्‍या त्या नेत्याला कधी सुबुध्दी येणार?, गावच्या सरपंचाने या प्रकाराबाबत उत्तर द्यावे, अशीही मागणी व्हायरल मॅसेजमध्ये करण्यात आली आहे.

मुलांना मी नाही सांगितले :  सरपंच दिनकर सोबले
बालमजुरी ही दुर्दैवी बाब आहे. त्या मुलांना मी सफाई करण्यास सांगितले नाही. स्वच्छता राबविणे ग्रामपंचायतच्या शिपायाचे काम आहे. त्याला आदेश दिले होते, त्याला मुलांकडून काम करण्यास मी सांगितले नाही, असे स्पष्टीकरण सरपंच दिनकर सोबले यांनी दिले.
----------------------------


अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.