भग्नावस्थेतील स्मशानभूमीला ‘स्मार्टग्राम’चा फलक !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गवत, वेड्या बाभळी, हात लावताच पडणार्‍या भिंती, पाणी नसलेल्या टाकीभोवती काटेरी विळखा, अंधारमय रस्ता अशा भग्नावस्थेत असलेल्या स्मशानभूमीला दिमाखात लावलेला ‘स्मार्टग्राम व्हिलेज जामगाव’ असा फलक पाहून ‘आश्‍चर्यम्’ असाच शब्द अनेकांच्या ओठी पडत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराविरोधात अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. 
Loading...

तालुक्यातील जामगाव गावाला गेल्या पाच महिन्यांपूर्वी ‘स्मार्टग्राम व्हिलेज’ पुरस्कार मिळाला. सर्वेक्षणाअगोदर ग्रामपंचायतीच्या तिजोरीतून संपूर्ण गावात साफसफाई, रंगरंगोटी करण्यात आली. सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकार्‍यांनी याच धर्तीवर गुण देऊन पारनेर तालुक्यातील ‘स्मार्टग्राम व्हिलेज’ चा पुरस्कार जाहीर केला. 

त्यानंतर ‘स्मार्टग्राम व्हिलेज जामगाव’ असा फलक संपूर्ण गावात ठिकठिकाणी आढळून आले. असाच फलक गावासाठी असलेल्या स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आला. मात्र ही स्मशानभूमीच्या अवस्थेकडे पाहून ही स्मार्ट का नाही? असाच प्रश्‍न नागरिकांना पडला. 

स्मशानभूमीच्या कंपाऊंडची एका बाजूची भिंती पडलेली आहे, ज्या उभ्या आहेत त्यांना हात लावताच ढासळत आहेत, मुख्य दरवाजा नसल्याने इतर प्राण्यांचा मुक्तसंचार, काटेरी गवतामुळे अनवाणी चालणे कठीण, पाण्याची सुविधा नाही, रात्रीचा अंधारमय रस्ता अशा भग्नावस्थेत असलेल्या स्मशानभूमीच्या दुर्लक्षामुळे ग्रामपंचायत प्रशासनासह सरपंच व सदस्यांचा अनेकांनी निषेध केला.

याबाबत सेवा सोसायटीचे माजी संचालक मिननाथ शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्या पती युवराज माळी, राजू डहाळे, नवनाथ शिंदे आदींसह ग्रामस्थांनी स्मशानभूमीच्या निकृष्ट बांधकाम व असुविधेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.