भाजप सरकारने मराठा समाजास फसवले,यापुढे मूक नव्हे तर ठोक मोर्चा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- वेळोवेळी सामंज्यस्याच्या भूमिका घेऊनही सरकार दखल घेत नाही. ५७ मूक मोर्चे काढूनही शासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याने सकल मराठा समाजास फसवले आहे. 

या निद्रिस्त शासनाला जागे करून हादरा देण्यासाठी शुक्रवारी (दि. २९) तुळजापूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने देवीचा जागरण गोंधळ घालून मोर्चा काढण्यात येणार आहे. 

यापुढे मूक मोर्चा नव्हे तर ठोक मोर्चे निघतील. या मोर्चात सकल समाजबांधवांनी पारंपरिक शस्त्र तसेच औजारासह उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केले.

Loading...
मराठा समाजाचे आरक्षणासह इतर प्रलंबित प्रश्न आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी तुळजापूर येथे बुधवारी (दि. २०) श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ मंगल कार्यालयात राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आबासाहेब पाटील बोलत होते. 

कोपर्डी प्रकरणानंतर मराठा समाजावर अन्याय होत असलेली भावना वाढीस लागून तसेच वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या आरक्षणाच्या मागणीची शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या झेंड्याखाली सकल मराठा समाजाने न भूतो न भविष्यती असे तब्बल ५७ विक्रमी महामोर्चे अत्यंत शांततेने काढून आपली ताकद दाखवून दिली; परंतु तरीही शासनाने याची दखल घेतली नाही. 

त्यामुळे पुन्हा समाजाने एकत्र येऊन लढा देण्यासाठी, विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रश्नांसाठी सुयोग्य रणनीती आखून नवा एल्गार पुकारण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले. 

शुक्रवारी (दि.२९) तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चास सुरुवात होणार असून तुळजाभवानी मंदिरासमोरील छत्रपती शहाजीराजे महाद्वारासमोर देवीचा जागरण गोंधळ घालून क्रांती मोर्चाच्या दुसऱ्या पर्वाला प्रारंभ होणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.