पगारवाढीसाठी संघर्ष करणाऱ्या एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना वेतनवाढ जाहीर


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पगारवाढीसाठी संघर्ष करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी एसटीच्या ७० व्या वर्धापनदिनी ४ हजार ८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ जाहीर झाली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात साधारण ३२ ते ४८ टक्के इतकी वाढ होणार आहे. राज्यातील १ लाख ५ हजार ६७९ एसटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असून कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही शिक्षणासाठी दरमहा ७५० रुपये आणि दैनिक भत्त्यात वाढ केल्याचीही माहिती दिवाकर रावते यांनी शुक्रवारी दिली. 

रावते यांनी सांगितले, सुधारित वेतननिश्चिती प्रशासकीय कामांच्या अधीन राहून तत्काळ लागू करण्यात येईल. परंतु, १ एप्रिल २०१६ ते ३० जून २०१८ या २६ महिन्यांच्या थकबाकीची रक्कम ११९७ कोटी रुपये ही ४८ समान हप्त्यांमध्ये अदा करण्यात येईल. कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढ अमान्य असल्यास प्रशासनाकडे तसे पत्र ७ जून २०१८ पर्यंत देणे आवश्यक आहे. ज्यांना ही वेतनवाढ मान्य नाही त्यांच्यासाठी महामंडळाने अन्य पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

अशा कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्यास चालकाकरिता २० हजार रुपये व वाहकाकरिता १९ हजार रुपये इतक्या ठोक वेतनावर ५ वर्षांसाठी त्वरित कंत्राटी पद्धतीने नोकरी दिली जाईल. दरवर्षी २०० रुपये वेतनवाढ करण्यात येईल, असेही परिवहनमंत्र्यांनी जाहीर केले. मान्यताप्राप्त संघटनेस ही वेतनवाढ मान्य असल्यास महामंडळाच्या प्रशासनाशी करार करण्यासाठी मुभा राहील, असेही परिवहनमंत्री दिवाकर रावते म्हणाले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.