चाळीस वर्षे निर्मितीचेच काम केले पण ज्यांनी काही उभे केले नाही त्यांनी टिका करावी हे दुर्दैवी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :माझ्यातील गुण व दुर्गुणांसहीत अकोल्याच्या जनतेने मला स्विकारले, म्हणूनच मला सात वेळा निवडून दिले. आपण गेली चाळीस वर्षे निर्मितीचेच काम केले पण ज्यांनी काही उभे केले नाही त्यांनी टिका करावी हे दुर्दैवी असून आजपर्यंत आपण कधी व्यक्तीगत टिका अगर निंदानालस्ती केली नाही. किंबहुना त्यालाही बळी पडलो नाही. जनतेची कामे करीत गेलो, असे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी म्हटले. 

अठ्ठयात्तराव्या वाढदिवसानिमित्त अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या कामगार व संचालक मंडळाच्या वतीने पिचड यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना पिचड बोलत होते.

पिचड म्हणाले की, गेली पस्तीस वर्षापासून आपण तालुक्यात पाणी अडविण्याचा कार्यक्रम राबविला. आज पाणी निर्माण झाले. शेतकरी पिकवू लागला पण आज शेती मालाला कवडीमोल भाव आहे. उसाला, टोमॅटोला, कांद्याला भाव नाही. याचे फार दु:ख आहे.

यापुढे येणाऱ्या प्रत्येक संकटाला मोठ्या धैर्याने शेतकऱ्याला तोंड द्यावे लागणार आहे. नवीन विचार जो आला आहे हा विचार विघातक असून त्याला कामातूनच उत्तर द्यावे लागणार आहे. सध्या कामापेक्षा रिकाम्याच चर्चा जास्त आहे. आज माझा जो सत्कार होतो आहे हा माझा नसून तालुक्याच्या जनतेचा सत्कार आहे. .

पिचड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव..!
माजीमंत्री मधुकरराव पिचड यांना आज सकाळपासूनच कार्यकर्ते-नागरीक यांनी राजूर येथे निवासस्थानी भेटून शुभेच्छा दिल्या. तसेच अकोले शहर, राजूर, कोतुळ सह तालुक्यात ठिकठिकाणी शुभेच्छांचे फ्लेक्स बघायला मिळाले. असाकाचे संचालक सुरेश गडाख यांनी तालुक्यातील धरणांची प्रतिकृती असलेल्या फ्लेक्स बोर्डची सर्वत्र चर्चा होती.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.