राहाता तालुक्यातील पुनर्विवाह करणाऱ्या तरुणाची फसवणूक प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- हनुमंतगाव (ता. राहाता) येथील तरुणाने घटस्फोटानंतर पुन्हा विवाह करण्यासाठी मध्यस्थामार्फत सोयरिक जमविली. ठरल्याप्रमाणे सर्व झाल्यानंतर विवाहाचे सोपस्कार पूर्ण होत असतानाच मुलगी अध्र्यातूनच निघून गेली. या विवाहसाठी खोटे कागदपत्रे तयार करून फसवणूक करताना सदर तरूणांकडून सुमारे तीन लाख रूपये लुबाडले. याप्रकरणी दोन महिलांसह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


राजू उर्फ राजेंद्र लक्ष्मण खरात (वय ४२, रा. नांदूर खंडाळा, ता. श्रीरामपूर), अंजली रामचंद्र कामत (वय ७०) व कल्याणी रामचंद्र कामत (वय २३, दोघी रा. आंबड, जि. जालना) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी : अतुल दिनेश कुलकर्णी (रा. हनुमंतगाव, ता. राहाता) यांचा घटस्फोट झाल्याने त्यांना पुन्हा विवाह करायचा होता.

Loading...
यासाठी त्यांनी विवाह जुळविणारे खरात यांच्याशी संपर्क केला. त्यांनी कल्याणी कामत असे नाव सांगून २३ वर्षे मुलीचे व एका ७० वर्षीय महिलेस तिची आई अंजली कामत असल्याचे सांगितले. सदर महिला कोकणस्त ब्राह्मण असून त्या अंबड (जि. जालना) येथील रहिवाशी असल्याचे सांगितले.

अंजली हिच्याबरोबर लग्न करण्यासाठी दोन लाख रूपये तसेच विवाह जुळविण्याची फी ३० हजार रूपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यास कुलकर्णी यांनी तयारी दर्शविल्याने २५ फेब्रुवारी २०१८ रोजी खरात हा दोन्ही महिलांना घेऊन घरी आला. त्यावेळी त्यांना दोन लाख ३० हजार रूपये दिले.

त्यानंतर ११ मे २०१८ रोजी कालभैरव देवस्थान (गोंधवणी रोड, ता. श्रीरामपूर) येथे विवाह करण्याचे ठरले. त्यासाठी ७० हजार रूपये किमतीचे दोन तोळे सोन्याचे दागिने सदर महिलांना दिले. तसेच वागणुकीचा करारनामा नोटरीसमोर करून घेतला.

लग्नाच्या दिवशी ११ मे २०१८ रोजी कल्याणी हिला वयाचा पुरावा मागितला असता खरात व दोन्ही महिलांनी सह्याद्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ब्राह्मणवाडा (ता. अकोले, जि. अहमदनगर) या शाळेचा कल्याणी रामचंद्र कामत नाव असलेला शाळा सोडल्याचा दाखला दिला.

त्यानंतर लग्नाच्यावेळी कल्याणी हिने लग्नास नकार दिला व विवाहाचे सोपस्कार अध्र्यावरच टाकून निघून गेली. याबाबत खरात व अंजली यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर शाळेच्या दाखल्याची संबंधित विद्यालयात जावून चौकशी केली असता प्रथमदर्शनी सदर दाखला खोटा व बनावट असल्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर फसवणूक झाल्याच्या संशयावरून ॲड. नांदूरकर यांच्यामार्फत खरात व दोन्ही महिलांना नोटीस पाठविली. खरात याने नोटीस घेतली, मात्र दोन्ही महिलांचा पत्ता अपूर्ण असल्याने त्या परत आल्या. दरम्याच्या काळात शाळेच्या मुख्याध्यापकांनी सदर दाखल्यावरील रजिस्टर नंबर व नाव खोटे असल्याचे लेखी कळविले. 

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुलकर्णी यांनी लोणी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूद्ध गु.र.नं. १२९/१८, भादंवि कलम ४२०, ४६८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.