मुले पळवून नेल्याची अफवा,विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- करंजी, ता. पाथर्डी येथील जि. प. प्रा. केंद्रशाळेत चाललेल्या मुलांना पळवून नेल्याची अफवा वाऱ्यासारखी गावामध्ये पसरली. यामुळे घाबरलेल्या पालकांनी केंद्रशाळेमध्ये धाव घेतली. व आपला पाल्य सुरक्षित असल्याबाबत माहिती घेतली. या वेळी एकाही मुलाला पळवून नेण्यात आलेले नसून कोणीतरी ही अफवा पसरवली असल्याचे सरपंच सौ. नसिम शेख व उपसरपंच शरदराव अकोलकर यांनी स्पष्ट केले. 

Loading...
गेल्या पाच सहा दिवसांपासून पाथर्डी तालुक्यातही लहान मुलांना पळवून नेले जात असल्याच्या चर्चा व अफवा गावोगाव सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दररोज अनेक पालक आपल्या मुला -मुलींना शाळेमध्ये आणून सोडतात व शाळा सुटल्यानंतर घरी घेऊन जाताना दिसत आहेत.

मुले पळवून नेणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असल्याची चर्चा -अफवा चिचोंडी, जवखेडे, मिरी, तिसगाव, शंकरवाडी, जोडमोहज या भागात सोशल मिडीया व तोंडोतोंडी प्रत्येक गावात पसरल्याने मुलांसह पालकांची डोकेदुखी वाढली आहे.

शाळेत येताना व पुन्हा शाळा सुटल्यानंतर मुलांनी संघटीतपणे घरी जायचे, आई -वडिलांचा मोबाईल नंबर वर्ग शिक्षकाकडे द्यायचा, एकट्या मुला -मुलीने कुठेही फिरायचे नाही, कोणी संशयित व्यक्ती शाळा -विद्यालय परिसरात फिरताना आढळल्यास याबाबतची माहिती तत्काळ शिक्षकांना द्यावी, अशा सूचना आता शाळा- विद्यालयांमधून दिल्या जात आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.