विखे पिता-पुत्रांची दहशत मराठा समाज मोडीत काढल्याशिवाय राहाणार नाही !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व त्यांचे पुत्र सुजय विखे हे राहाता तालुक्यात प्रशासनाला हाताशी धरून राजकीय दहशत निर्माण करत आहेत. त्यांची दहशत मराठा समाज मोडीत काढल्याशिवाय राहाणार नाही. प्रशासन जनतेसाठी असते, पण शिर्डी विधानसभा मतदानसंघात प्रशासन विखेंचे गुलाम झाले आहे. 

विखेंच्या आदेशावरून शिवप्रहारचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुलेंवर हद्दपारीची सुरू असलेली कारवाई प्रशासनाने त्वरित थांबवावी; अन्यथा राज्यातील सकल मराठा समाज शिर्डीत येऊन जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवप्रहारचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी मंगळवारी दिला.

शेतकरी आंदोलनादरम्यान शिवप्रहारचे जिल्हाध्यक्ष चौगुले यांनी टँकर अडवून दूध रस्त्यावर ओतले, या गुन्ह्याखाली त्यांच्यावर पोलिस व महसूल प्रशासनाने हद्दपारीची कारवाई सुरू केली आहे. या विरोधात मंगळवारी प्रांत कार्यालयाजवळ शिवप्रहार संघटनेने धरणे आंदोलन केले. 

Loading...
याप्रसंगी भोर बोलत होते. या वेळी एकनाथ घोगरे, जनार्दन घोगरे, शरद निमसे, डॉ. गुंजाळ, सचिन चौगुले, दत्ता आसने, राधू राऊत, शिवाजी चौधरी, श्रीकांत मापारी यांच्यासह शिवप्रहार व शेतकरी संघटनेचे जिल्ह्यातील कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

आपल्या भाषणात भोर यांनी राधाकृष्ण विखे व डॉ. सुजय विखे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवत टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, आजवर मराठा समाजाने विखे घराण्याला चाळीस वर्षे सत्ता दिली.मात्र, विखेंनी मराठा समाजासाठी काहीच योगदान दिले नाही. 

उलट सकल मराठा समाजाचे आंदोलन चिरडण्याचे काम केले. मराठा समाजाच्या आरक्षणाला विखेंचाच विरोध आहे. आम्ही आमच्या न्याय्य हक्कांसाठी राहाता, शिर्डी येथे मेळावे आयोजित केले, पण विखेंनी पोलिस यंत्रणेला हाताशी धरून ते हाणून पाडले. 

राहाता तालुक्यातील पोलिस व महसूल प्रशासनाला विखेंनी गुलाम बनवले आहे. यापुढे पोलिस प्रशासनाने विखेंची गुलामगिरी झुगारली नाही, तर मराठा समाजाच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. 

आजवर झोपडपट्टीतले दादा आम्ही ऐकून होतो, पण अलीकडच्या काळात शिर्डी मतदारसंघातील एका दादाने (डॉ. सुजय) धुडगूस घालायला सुरुवात केली. बीओटीच्या धर्तीवर तालुका ताब्यात दादागिरी व राजकीय दहशतीचे वातावरण निर्माण केले. 

त्यांच्या या राजकीय दहशतीला मराठा समाज भीक घालणार नाही. राहाता तालुक्यातील दादाचे दक्षिणेवर आलेले आक्रमण आम्ही परतावून लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. 

मराठा समाजाचे वादळ उठल्यावर विखे पिता-पुत्र कुठे उडून पडतील याचा पत्ताही लागणार नाही. पोलिस व महसूल प्रशासनाने चौगुलेंवरील हद्दपारीची कारवाई त्वरित थांबवावी आणि विखेंची राजकीय दहशत झुगारून सामान्य लोकांसाठी काम करावे, असे भोर म्हणाले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.