महिला सरपंचाच्या कामात हस्तक्षेप केल्यास गुन्हा दाखल होणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महिला सरपंच असलेल्या ग्राम पंचायतीं मध्ये बाह्यशक्‍तींचा हस्तक्षेप होत असल्याने ग्रामपंचायती मधील कर्मचाऱ्यांना कामकाज करणे अवघड झाले असून, चुकीच्या कामांसाठी दबाव टाकण्यात येत असल्याच्या तक्रारी झाल्याने नगर तालुका पंचायत समितीच्या सोमवारी झालेल्या मासिक बैठकीत यावर वादळी चर्चा झाली. 

महिला सरपंचांच्या कामात यापुढे हस्तक्षेप करण्यात आल्याच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आल्याची माहिती सभापती रामदास भोर यांनी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्‍के आरक्षण देण्यात आल्याने गावपातळीवर महिला मोठ्या संख्येने ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांसह सरपंचपद भूषवीत आहेत. 

Loading...
परंतु, त्यांना स्वतंत्रपणे काम करू दिले जात नाही. पती, मुलगा, सासरा, वडील ही मंडळी महिला सरपंच असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये हस्तक्षेप करताना दिसतात. 

त्यामुळे ग्रामसेवकांसह कर्मचाऱ्यांना काम करणे अवघड होत आहे. विशेष चुकीची कामे या बाह्यशक्‍तींकडून करण्याचा दबाव टाकण्यात येतो. 

परिणामी, या कर्मचाऱ्यांना दबावाला बळी पडून काम करावे लागते. त्यावरून गावपातळीवरील वाद देखील होते. 

कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागते. याबाबत अनेक ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांनी नगर तालुका पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. 

या तक्रारीची दखल घेऊन पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सभापती भोर यांनी चर्चा घडवून आणली. महिला आरक्षणामुळे महिलांना काम करण्याची संधी मिळाली आहे. 

त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे काम करू देणे आवश्‍यक आहे. मात्र, सरपंच पतीसह अन्य नातेवाईक ग्रामपंचायतींच्या कामकाजात हस्तक्षेप करणार असतील तर काम करणे अवघड आहे. 

ग्रामसेवकांना चुकीच्या कामांसाठी बळी पडावे लागते. हे टाळण्यासाठी यापुढे महिला सरपंचांच्या कामकाजात हस्तक्षेप करणाऱ्यांवर सरळ गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

तसा ठराव देखील करण्यात आला. असा ठराव करणारी पहिलीच पंचायत समिती आहे. 

एवढेच नव्हे तर पंचायत समितीमध्ये देखील ग्रामपंचायतींची कामे ग्रामसेवक व सरपंचांनी आणावीत. अन्य कोणी कामे आणल्यास ती न करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. 

अर्थात, गावपातळीवरील अन्य कामांसाठी ग्रामस्थ व अन्य कोणी आले तर चालतील; पण ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा भाग म्हणून अन्य कोणाची कामे करण्यात येणार नाही. ती ग्रामसेवक व सरपंचांनी आणावीत, असे स्पष्ट करण्यात आल्याचे भोर यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.