शहरात अजूनही मोकाट कुत्र्यांची दहशत !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहरात अजूनही मोकाट कुत्र्यांची दहशत असताना, महिला, ज्येष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरुन घराबाहेर पडावे लागत आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिका आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांना निवेदन देण्यात आले.


राष्ट्रवादीच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा रेखा जरे पाटील यांनी या विषयावर लक्ष वेधून, तातडीने कुत्रे पकडण्याच्या मोहिम हाती घेण्याचे सांगितले. डॉ.बोरगे यांनी सदर कामासाठी नव्याने नेमलेल्या संस्थेस सुचना करुन, कोंडवाडा विभाग प्रमुख म्हसे यांना याबाबत लक्ष घालून त्वरीत ही मोहिम सुरु करण्याचे आदेश दिले.

शहरात रोज सकाळी व संध्याकाळी कुत्र्यांचे टोळके फिरत असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरुन घराबाहेर पडावे लागत आहे. अनेक भागात कुत्र्यांनी लहान मुलांचे लचके तोडल्याच्या घटना ताजे असताना महापालिका प्रशासनाने जीवीतहानी होण्यापुर्वी तातडीने कुत्रे पकडण्याची मोहिम राबविण्याची मागणी करण्यात आली.

गेल्या अनेक वर्षापासून शहरातील कुत्रे पकडणे व त्यांचे निर्बीजीकरण करणे यांवर लाखो रुपयांचा खर्च होत आहे. मात्र दिवसंदिवस शहरात मोकाट कुत्र्यांचे प्रस्थ वाढतच आहे. कागदोपत्री या विभागाकडून काम चालू असून, वास्तूस्थिती वेगळी असल्याने एकप्रकारे शहरात कुत्र्यांची दहशत असल्याची प्रचिती येत आहे. या विभागाचे अधिकारी निष्क्रीय असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

काही दिवसापुर्वी देखील मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी रेखा जरे पाटील यांनी संबंधीत अधिकार्‍यांना निवेदन दिले होते. मात्र यावर कार्यवाही न झाल्याने पुन्हा निवेदन देवून आठ दिवसात शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यास शहर राष्ट्रवादीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

महापालिकेकडून मोकाट कुत्रे पकडण्यासाठी नवीन नेमलेल्या संस्थेला काही मुलभुत सुविधा पुरविल्या नसल्याने ही मोहिम स्थगित होती. डॉ.बोरगे यांनी तातडीने त्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन, ही मोहिम सुरु करण्याचे कोंडवाडा विभाग प्रमुख म्हसे यांना बजावले. यावेळी सोनाली जरे व मनिषा गायकवाड उपस्थित होत्या.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.