'गंगुबाई'ने मिळवली मुंबईकरांची वाहवा.....


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात 'अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अहमदनगर जिल्हा' शाखेच्या वतीने सेंट विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुलची विद्यार्थिनी बालकलाकार 'सर्वज्ञा अविनाश कराळे' आणि 'राहुल सुराणा' यांनी सादर केलेल्या एकपात्री प्रयोगास मुंबईकरांनी मनापासून दाद दिली. 

नाट्यसंमेलनात घडलेल्या घडामोडींचा सर्वज्ञाने अतिशय मनोरंजकतेने घेतलेला विनोदी आढावा उपस्थितांची दाद मिळवून गेला. नाट्य परिषद, मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, विक्रम गोखले, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा किर्तीताई शिलेदार यांच्या मिमिक्रीने उपस्थितांना खळखळून हसविले. 

Loading...
सर्वज्ञाला जेव्हा तुझं गाव कोणतं गं? असं विचारल, तेव्हा तीने सांगितले 'अहमदनगर' तेव्हा अनेकांनी तू 'नगर'चं नाव मोठं करशील अशा शब्दांत तीला आशिर्वाद दिला. प्रत्येक 'पंचेस'ला रसिकांच्या टाळ्या घेत जवळपास १५ मिनिटे सभागृह सर्वज्ञाने दणाणून सोडले. 

एवढ्या मोठ्या नाट्य संमेलनाच्या मंचावर मान्यवरांकडून झालेलं कौतुक, सर्वोत्कृष्ट सादकरीणाबद्दल नाट्य परिषदेच्या मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याकडून सन्मानचिन्ह देऊन केलेला गौरव, 'चला हवा येऊ द्या फेम' अभिनेते भारत गणेशपुरे, शाहिरी गायक नंदेश उमप यांनी दिलेली शाबासकी, अनेकांनी 'सर्वज्ञा'सोबत काढलेला सेल्फी निश्चितच नगरकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद होते. 

सर्वज्ञा अभिनयासोबतच शास्त्रीय संगीताचे ही शिक्षण घेत आहे. सर्वज्ञा आणि राहुल यांनी आजपर्यंत अनेक स्पर्धांमधून प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळविली आहेत.या दोघांनाही मार्गदर्शन आणि मुंबईच्या रंगमंचावर सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नाट्य परिषदेच्या नगर शाखेचे अध्यक्ष तथा मध्यवर्तीचे सहकार्यवाह सतीश लोटके यांनी मोलाची भूमिका बजावली. 

सर्वज्ञा व राहुलच्या या यशाबद्दल 'चला हवा येऊ द्या फेम' अभिनेते भारत गणेशपुरे, शाहिरी गायक नंदेश उमप, नाट्य परिषदेचे मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, मध्यवर्तीचे कार्यकरिणी सदस्य सतीश शिंगटे तसेच नगर जिल्हा शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या यशाबद्दल सर्व स्तरातून सर्वज्ञा आणि राहुलचे कौतुक करण्यात येत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.