कोपरगावला पाणी देण्यासंदर्भात खा. लोखंडेंनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- निळवंडे धरण कालव्‍यांच्‍या कामांना अद्यापही सुरुवात नाही. केंद्र सरकारचा निधी केव्‍हा मिळणार याचा ठोस निर्णय झालेला नाही. तरीही निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनव्‍दारे कोपरगावला पाणी देण्‍याबाबत सरकारने घेतलेल्‍या निर्णयावर खा. सदाशिव लोखंडे यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट करावी, अशी मागणी तळेगाव दिघे येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रसिध्‍दी पत्रकात म्हटले की, केंद्र सरकारच्‍या तांत्रिक सल्‍लागार समितीने निळवंडे धरण प्रकल्‍पाला मान्‍यता दिल्‍यानंतर तळेगाव व अन्‍य ठिकाणी खा. लोखंडे यांचे सत्‍कार सोहळे संपन्‍न झाले. या कार्यक्रमांमधून निळवंडे धरणाच्‍या कामाचे सर्व श्रेय खा.लोखंडे स्‍वत:च घेत आहेत.

Loading...
लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकाद्वारे खा. लोखंडे यांच्‍यासमोर काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत. धरणाच्‍या कामाचे सर्व श्रेय खा.लोखंडे हेच घेणार असतील तर लाभक्षेत्रात प्रलंबित असलेल्‍या व निर्माण झालेल्‍या प्रश्‍नांच्‍या सोडवणुकीसाठी लोखंडेंनी पुढे यावे, असे आवाहन लाभक्षेत्रातून केले.

खा. लोखंडे यांना निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा एवढा कळवळा असेल तर वर्षानुवर्षे पाण्‍यापासून वंचित राहिलेल्‍या जिरायती भागातील कालव्‍यांची कामे रेंगाळल्याबद्दल त्यांनी भूमिका स्‍पष्‍ट करावी. अकोले तालुक्‍यातही निळवंडे धरणाच्‍या कालव्‍यांची कामे जाणीवपूर्वक सुरू करू दिली जात नाहीत. कोपरगाव व राहाता तालुक्‍यात भूसंपादनाचे सर्व कामे पूर्ण होवूनही कालव्‍यांची कामे सुरु होवू शकलेली नाहीत.

याबाबतही या लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्‍हणून खा. लोखंडे लाभक्षेत्रातील तालुक्‍यांबाबत समान भूमिका घेवून न्‍याय मिळवून देणार का? असा प्रश्‍न ग्रामस्‍थांनी पत्रकात उपस्थित केला.दुष्‍काळी भागाच्‍या वाट्याला थेंबभरही पाणी आले नाही; मात्र संगमनेर नगरपालिकेने निळवंडे धरणाच्‍या पाण्‍यावर यापूर्वीच डल्‍ला मारला आहे.

निळवंडे धरणाची निर्मिती ही प्रामुख्‍याने जिरायती भागाकरिता झाली; मात्र या भागातील शेतकऱ्यांना वंचित ठेवून जर धरणातील पाण्‍याची उधळपट्टी होणार असेल तर लाभधारक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्‍याचाच हा प्रयत्‍न आहे.

आता लाभक्षेत्राबाहेरील कोपरगाव शहरालाही धरणातून पाईपलाईनव्‍दारे पाणी देण्‍याचा घाट घातला जात आहे. राज्‍य सरकारने याबाबत निर्णय घेतला. या विरोधात लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या संतप्‍त भावना असून सरकारच्‍या या निर्णयाला यापूर्वीच विरोध दर्शविला आहे.

धरणातील पाणी लाभक्षेत्राबाहेर कोपरगावला गेल्‍यास लाभक्षेत्रातील सिंचन क्षेत्रावर विपरित परिणाम होईल याची जाणीव खा. लोखंडे यांना असेल तर त्‍यांनी तातडीने या पाणी योजनेबाबत भूमिका स्‍पष्‍ट करणे गरजेचे आहे. या पत्रकावर रामदास दिघे, दिलीप दिघे, गणपत दिघे, बाळासाहेब दिघे, शिवाजी सुपेकर, विनायक सानप, मारुती लामखडे, शिवाजी परसराम दिघे, गोरक्षनाथ दिघे, कुणाल लामखडे, सुभाष दिघे, कॉ. अमोल मच्छिंद्र दिघे यांच्‍या सह्या आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.