डॉ. भिसे व कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे न घेतल्यास राष्ट्रवादीतर्फे राज़्यात आंदोलन !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड तालुक्यातील चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या ज़यंतीनिमित्त आयोज़ित कार्यक्रमात कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रताप ढाकणे यांनी केली आहे. ॲड. ढाकणे यांनी तुरुंगातील आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यानंतर जामखेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष राजेंद्र कोठारी, माजी जि. प. सदस्य प्रा. मधुकर आबा राळेभात, जि. प.चे माजी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष शरद शिंदे, नगरसेवक अमित जाधव, नितीन हुलगुंडे, सचिन हाळनोर, अवदूत पवार उपस्थित होते. 

Loading...
ॲड. ढाकणे पुढे म्हणाले, चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात ज़्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत, त्यामध्ये डॉक्टर, शिक्षक व सुशिक्षित व मराठा समाज़ाचे तरुण आहेत. अज्ञात व्यक्तीने दगड मारल्याने या घटनेत पोलीस कर्मचारी जखमी झाला. 

मात्र, आरक्षणाची मागणी केली म्हणून डॉ. इंद्रकुमार भिसे व इतर कार्यकर्त्यांवर ३०७ सारखे कलम लावण्यात आले आहे. सरकार धनगर अरक्षणाबाबत काहीच बोलत नाही. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी राजकारण अवश्य करावे. मात्र, ते निवडणुकीपुर्ते असावे.

ना. शिंदे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी पालक म्हणून सर्वांना समान वागणूक द्यावी. सत्तेत राजकारण विचारांचे असावे, स्पर्धा व द्वेषाचे राजकारण करू नये, ते फार दिवस टिकत नाही. गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. 

जामखेड शहरात दुहेरी हत्याकांड घडूनही यातील उर्वरित आरोपी सापडत नाही, याचे आश्चर्य वाटते. येत्या पंधरा दिवसांत डॉ. इंद्रकुमार भिसे यांच्यासह कार्यकर्त्यांवरील दाखल केलेले खोटे गुन्हे मागे न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज़्यात आंदोलन छेडण्याचा इशारा ढाकणे यांनी दिला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.