पोलीस स्टेशनच्या मागणीसाठी वर्षा निवासस्थानासमोर आत्मदहनाचा इशारा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील पोलीस स्टेशनला मान्यता मिळवून २४ वर्षे झाले आहेत. तरी पोलीस स्टेशन अस्तित्वात येत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानासमोर ५ जुलै रोजी आत्मदहन करणार असल्याचे देवळाली प्रवरा शिवसेना शहरप्रमुख सुनील कराळे यांनी सांगितले.

देवळाली प्रवरा हा नगरपालिकेचा भाग असून त्याचबरोबर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघास जोडलेल्या देवळाली प्रवरासह मंडलातील ३२ गावे या पोलीस स्टेशनअंतर्गत येतील. गेल्या २४ वर्षांपासून मंजूर असले पोलीस स्टेशन अद्यापही अस्तित्वात आले नाही.

Loading...
एप्रिल महिन्यात आत्मदहन करण्याचे निवेदन दिले असता १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पोलीस स्टेशन चालू करण्याचे आश्वासन देवून आंदोलन स्थगित करण्यास सांगितले होते; परंतु १ मे ला पोलीस स्टेशन सुरु झाले नसल्याने मला पुन्हा आत्मदहन करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

सुनील कराळे निवेदनात म्हणाले की, १९९४ साली युती सरकार असताना युतीचे तत्कालीन आमदार चंद्रशेखर कदम यांनी स्वतंत्र देवळाली प्रवरा पोलीस स्टेशनला मंजुरी मिळवली होती. तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख यांनी जागेची पाहणी करुन नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता.

देवळाली प्रवरा नंतरच्या पोलीस स्टेशन घारगाव, आश्वी, सुपा, बेलवंडी आदी मंजूर करण्यात येवून पोलीस स्टेशन अस्तित्वात आले आहेत. देवळाली प्रवरा शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचबरोबर गुन्हेगारी वाढत आहे. शहरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिसांचे बळ कमी पडत आहे.

स्वतंत्र पोलीस स्टेशन होणे गरजेचे आहे. राज्यात व केंद्रात भाजपा-शिवसेनेचे सरकार आहे. तरीही पोलीस स्टेशनचा प्रश्न सुटत नाही. सरकार पोलीस स्टेशन करण्याचा गांभीर्याने दखल घेत नाही. त्यामुळे आत्मदहन करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे, असे सुनील कराळे यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.